ऑनलाईन कर्जमाफीला ऑफलाईन प्रमाणपत्र

ऑनलाईन कर्जमाफीला ऑफलाईन प्रमाणपत्र

सांगली -  शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य शासनाने ऑनलाईन प्रक्रिया राबवली. राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याचा प्रयत्न फसला आहे. जिल्ह्यातील २६ शेतकऱ्यांना बुधवारी कर्जमाफीची प्रमाणपत्रे दिली गेली. तीही ऑफलाईन. कारण...ऑनलाईन कर्जमाफी यादीचा घोळ हे होय. तो घोळ अद्यापही सुरूच आहे. तरीही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर अनुदानाची रक्कम सोमवारी (ता. २३) जमा करणार, अशी सरकारची घोषणा आहे.

कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानास १०० टक्के पात्र असलेली यादी ‘आपले सरकार’ संकेत स्थळावर टाकली आहे. हिरव्या यादीत कमी आणि पिवळ्या यादीत किती शेतकरी आहेत हेच पाहणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत त्रुटीची पिवळी यादी प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत या त्रुटी पूर्ण करता येणार नाहीत. त्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा विषय सातत्याने गाजतो आहे. कर्जमाफीच्या निकषातील बदल आणि निकष अंतिम झाले. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पार पडली. तरीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे त्रांगडे कायम आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने सांगली जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यभर कर्जमाफी प्रमाणपत्रे वितरणाचा प्रातिनिधिक कार्यक्रम उरकला. कर्जमाफीची प्रक्रिया ऑनलाईन राबवली असताना प्रत्यक्षात लाभार्थींना कर्जमुक्तीची दिलेली प्रमाणपत्रे मात्र ऑफलाईन प्रक्रियेच्या आधारे राबवण्यात आली. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात समारंभात ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे दिली गेली ती प्रमाणपत्रे प्रशासनाने काढून 
घेतल्याचा अजब प्रकार चव्हाट्यावर आला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले; मात्र कर्जमाफीबरोबरच शेतीमध्ये गुंतवणूक वाढली पाहिजे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे आणि यापुढील काळामध्ये त्याच्यावर कर्ज काढण्याचे संकट येऊ नये, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. कर्जमाफीच्या माध्यमातून राज्य शासनाने बळिराजाला बळ दिले आहे, असे वारंवार मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी घोषित करतात. दिवाळीनंतर पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, अशीही चर्चा आहे. दिवाळीनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी म्हणजे २३ ऑक्‍टोबरला कर्जमाफी देण्याचा शासनाचा इरादा आहे; मात्र ती दिली जाईल, याची मात्र खात्री कोणताही अधिकारी देत नाही. 

राज्य शासनाच्या सन २००९ ते २०१६ या कालावधीत थकीत कर्ज असलेल्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली, त्यांनाही २५ हजार रुपये प्रोत्साहनपर देण्यात येणार आहेत; मात्र या अनुदानासाठी आणखी किती दिवस तिष्ठत राहायचे असा प्रश्‍नच आहे. 

प्रशासन म्हणते की, कर्जमाफीच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर परस्पर जमा होतील. जिल्ह्यात ३.४७ लाख ऑनलाईन अर्जांची नोंदणी झाली. त्यातील १ लाख ८६ अर्ज (कुटुंब) आलेत. १०० टक्के अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे ४५३ गावांतील कर्जमाफी याद्यांचे चावडी वाचन दिवाळीनंतर होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com