हिंगोलीच्या उपाधीक्षकांनी घेतले प्रांजलचे पालकत्व

हिंगोलीच्या उपाधीक्षकांनी घेतले प्रांजलचे पालकत्व

सांगली - पोलिसांच्या मारहाणीत सांगली शहर पोलिस ठाण्यात अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिस दल बदनाम झाले. याच खाकी वर्दीतील मायेचा ओलावाही आज दिसला. अनिकेतची तीन वर्षांची चिमुरडी कन्या प्रांजल हिचे पालकत्व हिंगोलीच्या उपाधीक्षक सुजाता पाटील यांनी स्वीकारले. त्यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांना पत्र लिहून विनंती केली.

प्रांजलच्या शिक्षणाचा खर्च करण्याची इच्छा त्यांनी पत्रातून व्यक्त केली होती. त्यांचे पती आबासाहेब पाटील यांनी आज सांगलीत येऊन कोथळे कुटुंबाची भेट घेऊन पालकत्व स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

सुजाता पाटील नांदेड परिक्षेत्रांतर्गत हिंगोलीच्या उपाधीक्षक (गृह) आहेत. सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत अनिकेतचा मृत्यू झाल्याचे त्यांना समजले. त्याला तीन वर्षांची मुलगी आहे, अशी माहिती त्यांना मिळाली. त्यांनी श्री. नांगरे-पाटील यांना पत्र पाठवून प्रांजलचे पालकत्व स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली.

श्रीमती पाटील यांनी गेल्या महिन्यात श्री. नांगरे-पाटील यांना पाठवलेल्या पत्रात अनिकेतच्या लहान मुलीचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी आहे. तिच्या शिक्षणाचा व येणारा पूर्ण स्वत:च्या वेतनातून करण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. मुलीचे  पालकत्व मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती त्यांनी केली. श्री. नांगरे-पाटील यांनी कोथळे कुटुंबाला याची माहिती देऊन त्यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले.

उपाधीक्षक सुजाता पाटील यांचे पती आबासाहेब यांनी आज सांगलीत येऊन कोथळे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी प्रांजलसाठी नवीन ड्रेस आणि खाऊही आणला होता. अनिकेतची पत्नी संध्या, आई अलका, भाऊ आशिष आणि अमित, वडील अशोक यांची भेट घेतली. प्रांजलच्या शिक्षणासह तिच्या विवाहापर्यंतचा खर्च करण्याची तयारी त्यांनी दर्शवल्याची माहिती आशिष कोथळे याने दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com