‘विशेष अभय’ पुन्हा सुरू करा - पतंगराव कदम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

कडेगाव - आघाडी शासनाच्या काळात राज्यातील बंद उद्योगांना नवसंजीवनी देण्यासाठी विशेष अभय योजना सुरू केली होती. योजनेची मुदत मार्च २०१७ मध्ये संपली. ही योजना पुन्हा सुरू करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. आजारी व बंद पडलेल्या टेक्स्टाईल पार्कमधील उद्योगांना विशेष पॅकेज मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती आमदार पतंगराव कदम यांनी दिली.

एमआयडीसीमधील टेक्स्टाईल पार्कला घरघर लागली आहे. उद्योजकांवर मजुरीची वेळ आली आहे. तेव्हा हा उद्योग अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आमदार कदम यांनी आज एमआयडीसीचे अधिकारी, उद्योजक व बॅंकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम आदी उपस्थित होते.

ते म्हणाले,‘‘कडेगाव दुष्काळी तालुका होता. दुष्काळी भागाचा कायापालट करण्यासाठी व उद्योग विकासाला चालना देण्यासाठी उद्योगमंत्री असताना एमआयडीसी सुरु केली. सन २००० च्या दरम्यान उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष पॅकेज योजना राबवण्यात आली. मी उद्योगमंत्री असताना येथे औद्योगिक विकास झाला. सध्या येथील काय तर राज्यातील यंत्रमाग उद्योजक अडचणीत आहेत. हे उद्योग नफ्यात चालले पाहिजेत यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. शासन स्तरावर सर्वोपरी प्रयत्न करणार आहे.’’ विश्वजीत कदम म्हणाले,‘‘विकासांच्या प्रक्रियेत उद्योगांचा मोठा वाटा आहे. टेक्‍सटाईल पार्कमधील उद्योग चुकीच्या धोरणामुळे अडचणीत आलेत. 

हे उद्योग ताकदीने उभे राहणे आवश्‍यक आहे. त्यासाठी अडचणीतील उद्योग व उद्योजकांना शासनाने साखर कारखान्यांच्या धर्तीवर विशेष पॅकेज जाहीर करावे. वीजेचे दरही कमी करावेत. बॅंकांनी धोरणात्मक निर्णय घेऊन उद्योगांला चालना देणे गरजेचे आहे.’’

बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उद्योग विभागाचे महाव्यवस्थापक एन. बी. कोळेकर, शाखा प्रमुख प्रकाश देवलापूरे, बॅंक ऑफ इंडियाचे विभागीय व्यस्थापक नितीन देशपांडे, मुख्य व्यवस्थापक पाध्ये, कडेगावच्या शाखा प्रमुख अनघा बर्डे, उद्योजक अजय भस्मे, विनय भंडारी, असिफ तांबोळी, भीमराव मोहिते, आनंद शिंदे, दिनकर माळी, रवी भोसले, संजय मोहिते, प्रमोद पाटील, संजय सावंत, संताजी यादव, आर. आर. पाटील, सुहास कराडकर आदी उपस्थित होते.

Web Title: sangli news patangrao kadam comment