देवराष्ट्रेच्या कविसंमेलनात उमटला सामाजिक वेदनेचा हुंकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

आळसंद -  अंधश्रद्धेच्या नावाखाली भक्तांची भोंदूबाबांकडून होणारी फसवणूक, वाढता भ्रष्टाचार, स्त्रियांच्यावर होणारे अत्याचार, जागतिककरणाच्या रेट्यात उद्‌ध्वस्त होत चालेलं गावाचं गावपण, गांधीजींचा हरपत चालेला आदर्शवाद यांसह अनेक विषयांवर भाष्य करणाऱ्या कविता देवराष्ट्रेच्या कविसंमेलनात सादर झाल्या. निमित्त होतं वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्या दिनानिमित्त झालेल्या ‘आमची शिदोरी आमचं संमेलन.’

कवी एम. बी. जमादार यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. गटशिक्षण अधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर (तासगाव) यांनी कविसंमेलनाचे उद्‌घाटन केले. खानापूर- कडेगाव तालुका साहित्य परिषद व वृक्षमित्र धों. म. मोहिते चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कविसंमेलन झाले.

 महेश कराडकर यांच्या ‘सहा हातांचं माकडं’ कवितेने कविसंमेलनाला प्रारंभ झाला. जातियवादाच्या राजकारणात गांधीजींचा आदर्शवाद हरपत आहे. यावर भाष्य करणारी कविता सादर केली. ते म्हणतात, 
 ‘गांधीजी, तुम्ही सत्याग्रह करून उपोषण करून अहिंसेचा मंत्र देऊन ‘चलेजाव’ नारा देऊन स्वतंत्र केलीली ही मातृभूमी, आम्ही आता ठराव करून पुन्हा पारतंत्र्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवलीय.’,

अनैतिक संबंधांच्या सिरियल्समध्ये सारे रंक-राव रात्रंदिवस बुडाल्यावर तुमचा गांधीवाद कुणी समजून घ्यायचा? तुमच्या सोज्ज्वळ टोपीखाली आता लफडेबाज मेंदूंनी बिनदिक्कत आसरा घेतलाय...गांधीजी !’ 

अंधकवी चंद्रकांत देशमुखे यांनी ‘घुसं’ कवितेतून  वाढत्या भ्रष्टाचारोवर आसूड ओढला. प्रा. विश्‍वनाथ गायकवाड यांनी ‘भक्त आणि बाबा’ ही कविता सादर केली. कवयित्री लता ऐवळे-कदम यांनी स्त्री जीवनावर भाष्य करणारी कविता सादर केली. 

रघुराज मेटकरी यांनी धों. म. अण्णांच्या कार्याचा कवितेच्या माध्यमातून आढावा घेतला. रानकवी सु. धों. मोहिते, किरण शिंदे, हरिभाऊ पुदाले, अशोक पवार, एम. बी. जमादार, रविकुमार मगदूम, सदानंद माळी आदींनी कविता सादर केल्या.

मोहिते यांच्या नावे वृक्षारोपण  
सागरेश्‍वर अभयरण्याचे निर्माते वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्या स्मृती वृक्षरूपाने चिरंतन राहाव्यात, यासाठी अभयारण्यात जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी वृक्षारोपण केले. मिरजेचे गटविकास अधिकारी राहुल रोकडे, प्रदीप सुतार, धर्मेंद्र पवार, वनक्षेत्रपाल सतीश साळी, यशवंतराव चव्हाण प्रबोधिनीचे अध्यक्ष दत्तात्रय सपकाळ आदी उपस्थित होते.