पोलिस म्हणतात... चोराला तुम्हीच पकडून द्या

पोलिस म्हणतात... चोराला तुम्हीच पकडून द्या

सांगली -  बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरीचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. ऐन दिवाळीच्या हंगामात चोरट्यांनी गाडीत चढताना महिला प्रवाशांच्या पर्स, दागिने लांबविण्याच्या घटना घडल्या. मात्र त्यांची तक्रार घेण्यास पोलिस टाळाटाळ करीत आहेत. उलट तुम्हीच संशयित चोर पकडा, आमच्या ताब्यात द्या, असा अजब फंडा ते शिकवत आहेत. हाच प्रकार मोबाईल चोरांबाबतही होत आहे. त्यामुळे चोर आणि पोलिसांचा हा खेळ नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.

गेल्या आठवडाभरात बसस्थानकावरून काही महिलांचे दागिने चोरीस जाण्याचे प्रकार घडले. मायणी (जि. सातारा) येथील एक महिला जयसिंगपूर येथे माहेरी आली होती. ती काल (ता. २८) दुपारी सांगली-इचलकरंजी गाडीत चढत असताना चोरट्याने तिच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे गंठण लांबविले. चोरी झाल्याचे लक्षात येताच महिलेने स्थानकावर ड्यूटीस असलेल्या पोलिसाला चोरीची घटना सांगितली. मात्र पोलिसाने ती फारशी गांभीर्याने न घेता, तुम्हीच दागिने घरी विसरला असाल, घरीच पाहा, असा अनाहूत सल्ला दिला. पण महिलेने गळ्यातून गंठण चोरल्याचे सांगितले. त्यावर तुमचा कोणावर संशय आहे का? आजूबाजूला कुणी चोरटा आहे का पाहा, त्याला पकडा आणि माझ्या ताब्यात द्या, असा अजब फंडा सांगितल्यावर महिलेने सरळ शहर पोलिस ठाणे गाठले. तेथे फिर्याद घेण्यापेक्षा कच्ची तक्रार घेण्यात आली. त्यामुळे चोरट्याचा तपास होईल की नाही, याबाबत शंकाच आहे.

मोबाईल चोऱ्यांचीही हीच गत
शनिवारच्या आठवडे बाजारात, तसेच ऐन सणासुदीच्या हंगामात बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन गेल्या काही महिन्यांत मोबाईल, दागिने चोऱ्यांच्या घटनाही घडल्या आहेत. काही वेळा तर एकाच दिवशी मोठ्या संख्येने मोबाईल चोरीच्या घटना घडतात. त्यांचीही तक्रार घेण्यास पोलिस टाळाटाळ करतात, असा तक्रार देण्यास गेलेल्यांचा अनुभव आहे.

यापूर्वीही दोन घटना
काही दिवसांपूर्वी समडोळीला निघालेल्या एका महिलेची पर्स चोरट्याने लांबवली होती. कर्नाळ रोड पोलिस चौकीजवळ गेल्यावर महिलेस चोरीचा प्रकार लक्षात आला. तिने वाहकाला चोरी झाल्याचे सांगितले. तिच्या पर्समधून सात तोळे सोन्याचे दागिने लांबविण्यात आले होते. संबंधित महिला दुसऱ्या दिवशी तक्रार देण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात आली होती. मात्र तक्रार घेण्यासाठी तिला दिवसभर ताटकळत ठेवण्यात आले.
यानंतर दोनच दिवसांत पुन्हा एका गाडीत महिलेच्या पर्समधून दागिने चोरण्याची घटना घडली. सांगली-कुरुंदवाड गाडीतून खिद्रापूरला निघालेल्या एका वृद्ध महिलेच्या पर्समधून पाच तोळ्यांचे दागिने चोरीस गेले. दरम्यान, एका वडाप गाडीतून निघालेल्या महिलेचीही पर्स चोरट्याने लांबवली. यात दागिने, रोख रक्‍कम असा मुद्देमाल होता. या सर्व चोरीच्या घटनांची कच्ची तक्रार घेण्यात आली.

मोबाईल चोरी सापडत नाही
हल्ली मोबाईल चोरी झाला तर तो सायबर लॅबमधून कुठे आहे, याचे लोकेशन मिळू शकते. मात्र, ते लोकेशन शोधून चोरट्याचा माग काढण्यासही पोलिस तयार नसतात. अँड्रॉईड हॅंडसेटला अँटी थेप्ट सिस्टीम असते. त्याद्वारे मोबाईल चोरी रोखता येते. किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा माग काढता येतो. त्यामुळे महागडा मोबाईल हरवला तर तो शोधण्यासाठी तक्रार दिली जाते. मात्र, पोलिस तो शोधण्यासाठी फारसे उत्सुक नसतात, हे वास्तव आहे.

कच्ची तक्रार का?
अनेकदा दागिने किंवा मोबाईल चोरी झाली तर सरळ फिर्याद देण्यासाठी तक्रारदार तयार असतो. मात्र, पोलिसच त्यांना कच्ची तक्रार देण्यास भाग पाडतात. पोलिसांचे हे गौडबंगाल तक्रारदारांच्या लक्षात येत नाही. त्यांचे चोरट्यांशी ‘चोरटे’ संबंध तर नसावेत, अशी शंका येण्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे दागिने आणि मोबाईल चोरटे सापडत नाहीत आणि कच्च्या तक्रारीमुळे पोलिसही त्याची दखल घेत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com