टोळीयुद्धानंतर विरोधी पक्ष नेते पोलिस ठाण्यात कशासाठी?

टोळीयुद्धानंतर विरोधी पक्ष नेते पोलिस ठाण्यात कशासाठी?

सांगली - शुक्रवारी टोळीयुद्धातून एका गुंडाचा खून  झाला आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीची अख्खी पलटणच उतरली. यात दोषी-निर्दोषत्वचा फैसला होईल न होईल. मात्र ज्या पद्धतीने महापालिकेतील  विरोधी पक्षनेते शेठजी मोहिते आणि माजी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी आपल्या काही गुंड टोळ्यांशी संबंध असलेल्या नगरसेवकांच्या पलटणीसह टोळीयुद्धातून झालेल्या खुनासारख्या प्रकारांमध्ये कोणाच्या तरी सहानभूतीपोटी पोलिस ठाण्यात जमा  होतात, तेव्हा गुन्हेगारी वर्तुळाशी घट्ट झालेले नातेसंबंधच अधोरेखित होतात, या सर्व प्रकाराची आता शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. नेत्यांनी याचे उत्तर आता सांगलीकर नागरिकांना द्यावे.

गुंडांचा राजकारणासाठी वापर हा तसा जुनाच विषय  आहे. कोणतेही पक्ष यास अपवाद नाहीत, मात्र गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वांधिक म्हणजे तब्बल १२ गुंडांना उमेदवारी दिल्याने लोकांनी तोंडात बोटे घातली होती. दिवंगत नेते आर. आर. पाटील त्या वेळी गृहमंत्री होते. त्यांनाही या प्रश्‍नावर मौन बाळगावे लागले होते. दाद्या सावंतसारखे गुंड या पक्षात आले. पुढे त्यांचाही टोळी युद्धात खून झाला हा सारा इतिहास सांगलीकरांना परिचित आहे. मात्र यातून राष्ट्रवादीने कोणतेही शहाणपण घेतलेले नाही, याबद्दल लोक आश्‍चर्य व्यक्‍त करत आहेत. 

महापालिकेतील अनेक फरार रेकॉर्डवरील गुंडांचे आश्रयदाते कोण, त्यांच्यासाठी उच्च न्यायालयातील जामिनासाठीची लढाई कोण लढते, त्यासाठीची रसद  कोण पुरवते अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधली तर गुन्हेगारांची राजकीय पाळेमुळे सहजपणे लक्षात येतात.  हे पोलिसांनाही माहीत असते. खरे तर प्रत्येक गुन्हेगाराची कुंडली पोलिस ठाण्याला तयार असते. त्याच धर्तीवर त्यांच्या आश्रयदात्यांचीही हवी. पालिकेच्या राजकारणातील भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारांचे हातात हात सख्य हळूहळू राजकारणाच्या सर्व क्षेत्रात मुरत जाते.  हळूहळू त्याचे सर्वत्र प्रतिबिंब दिसते.

गुन्हेगाराच्या आश्रयाने सुरू असलेले राजकारण शेवटी गुन्हेगारच राजकारणी होईपर्यंत जाते याचे दाखले देशभर आहे. सांगली महापालिका क्षेत्रातही या प्रवृत्तीची जागोजागी लागवड होत असलेली दिसते. 

राजकारण आणि गुन्हेगारीचे सख्य अंतिमतः व्यवस्थेच्या मुळावर येते. जिथे संवाद व्हावा तिथे मग केवळ वाद उरण्याची शक्‍यता उरते. सत्तेचा सूर्याची चाहूल लागताच त्या दिशेने तोंड करीत जाणाऱ्यांमध्ये असे गुन्हेगार, राजकारणीही असतात. भाजपमध्ये सुरू असलेली भरतीही त्याचेच द्योतक आहे. तेच पीक आगामी महापालिका निवडणुकांवेळी भाजपच्या शिवारात जोमदारपणे फोफावेल अशी चिन्हे आहेत. आता यातूनच गुंड दल बदलतील, पण कायदा व सुव्यवस्थेलाच हे आव्हान आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com