आयुक्त, सत्ताधाऱ्यांचा प्रॉब्लेम काय?

आयुक्त, सत्ताधाऱ्यांचा प्रॉब्लेम काय?

सांगली - महापालिकेचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही...इतके बेभान झालेत, की गटनेतेच माईक भिरकाऊन मारताहेत. नागरिक हैराण आहेत. डासांपासून पिण्याच्या पाण्यापर्यंत साऱ्या प्रश्‍नांनी शहर वेठीला धरलंय. एका बाजूला महापालिकेच्या तिजोरीवर सत्ताधारी दरोडा घालत असल्याचा, तर दुसऱ्या बाजूला आयुक्तच विकास अडवताहेत, असा आरोप सत्ताधारी करत आहेत. पण आयुक्त याबाबत नेमकं काय आहे ते बोलत नाहीत. महासभेला सामोरे जात नाहीत, नागरिकांशी संवाद साधत नाहीत... या आयुक्‍तांचा आणि सत्ताधाऱ्यांचा नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे? लोकांना उत्तर हवंय.

नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे मॉर्निंग वॉक करत ‘फायली’ साफ करताहेत. तेसुद्धा सत्ताधाऱ्यांना कायदा मोडू देत नाहीत. ‘सकाळ संवाद’मध्ये एक रणरागिणी म्हणाली, ‘‘आयुक्त फायली अडवत असतील तर आम्ही त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढतो.’’ नगरसेवक तुमचे नाव घेऊन स्वतःचे अपयश झाकत आहेत का? खरंच तुम्ही त्यांच्या फायली अडवल्या आहेत का? त्या कुठल्या आहेत आणि का अडवल्या आहेत, एकदा दूध का दूध का नाही करत? तुम्ही भाजप नेत्यांचे ऐकूण हे करताय, असा आरोप होतोय. तसे नसावे, असा विश्‍वास सांगलीकरांनी ठेवावा का? तो ठेवला किंवा नाही ठेवला तरी त्यामुळे प्रश्‍न सुटणार नाहीत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे काँग्रेस अन्‌ भाजपच्या चिखलफेकीत तुम्ही बदनाम होताय. त्यामुळे कदाचित तुम्हाला काही फरक पडत नसेलही... मात्र गुंठेवारी भागातील सांगलीकरांच्या नरकयातनांना काय उत्तर आहे? काम पूर्ण नसताना ड्रेनेज ठेकेदाराची बिले का मंजूर केली? दुसऱ्या मजल्यावर पाणी चढत नाही म्हणून ओरडणाऱ्या गृहिणीला ‘फाईल अडलीय’, हे कारण द्यावं का? रात्री कानात भोंगा वाजवत डंख मारणाऱ्या, रक्त शोषणाऱ्या, झोप उडवणाऱ्या डासांना दोष द्यावा की काँग्रेसला द्यावा, की तुमच्या यंत्रणेला? महाआघाडीच्यावेळी जयंतराव तर सत्ता द्या, सहा महिन्यांत सांगली डासमुक्‍त करतो, असे म्हणाले होते. लोकांनी त्यांना सत्तेतून मुक्‍त केले; पण डास अजून थैमान घालताहेत. ओला कचरा आम्ही घेत नाही, असे सांगून तो झिडकारणाऱ्या घंटागाडीवाल्या मावशीसोबत महापालिकेच्या धोरणावरून आम्ही भांडावे का, असा प्रश्‍न सामान्य सांगलीकर विचारतोय. 

आयुक्तसाहेब, गटार करण्याआधी रस्ता केला जातो... पुन्हा रस्ता खोदून गटार केली जाते... आपले कार्यकारी अभियंता तुम्हाला विचारत नाहीत का? तुंबलेल्या गटारींची दुर्गंधी तुमच्या नाकापर्यंत पोहोचत नाही का? काल मिरजेच्या अमृत योजनेबाबत महापालिकेत विशेष महासभा झाली. तेथे तुम्ही गैरहजर... अर्थात तेथे हजर राहावेच, असे बंधन नाही, असा तुमचा युक्तिवाद आहे. कारभारी तुम्हाला अर्वाच्च शब्दांत बोलतात, असेही तुमचे मत आहे.  तुमचा आणि आयुक्‍त या पदाचा सन्मान राखला पाहिजे. कारण सत्ताधाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच तुमचे पद आहे.

तुम्ही कायद्यानेच वागा, पण तुम्ही लांब पळावे, नागरिकांच्या हिताचे नाही. कारण, महापालिका करून महाचूक झाली, असा संताप प्रत्येक सांगलीकर करतोय. त्याचे जाबदार तत्कालीन मंत्री अण्णासाहेब डांगे  यांच्यावर त्याची पावती फडणे सहाजिक आहे, मात्र या पालिकेला दिशा देणारा, पुढे नेणारा, सांगलीकरांशी  जोडून घेणारा, इथल्या राजकीय अनास्थेवर मात करून स्वतःच्या हिमतीवर विकास करणारा एखादा अपवाद वगळता अधिकारीच मिळाला नाही, ही खंत आहे. आता तुम्ही फाईली अडवित असता आरोप आहे, याचा  जनतेला खुलासा हवा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com