कर्जमाफीची श्‍वेतपत्रिका काढाः प्रा. एन. डी. पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

सांगलीः राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीचा घोळ घालत आहे. त्यांनी आधी शांतपणाने विचार करावा, आपण काय आश्‍वासने देत आहोत, ती पूर्ण करू शकू का, याचा अभ्यास करावा. त्याची श्‍वेतपत्रिका काढावी आणि मग घोषणा करावी, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांनी आज (बुधवार) येथे पत्रकारांशी बोलताना मांडले.

सांगलीः राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीचा घोळ घालत आहे. त्यांनी आधी शांतपणाने विचार करावा, आपण काय आश्‍वासने देत आहोत, ती पूर्ण करू शकू का, याचा अभ्यास करावा. त्याची श्‍वेतपत्रिका काढावी आणि मग घोषणा करावी, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांनी आज (बुधवार) येथे पत्रकारांशी बोलताना मांडले.

ते म्हणाले, "सरकारने आधी स्वतःचे वर्तन तपासण्याची ही वेळ आहे. ते बोलतात एक आणि करतात एक, असे झाले आहे. शेतकरी हा कमी शिकलेला, सामान्य माणूस आहे. तो लगेच गोंधळून जातो. सरकारच्या धरसोड धोरणाने हे होते. सुकाणू समिती असेल किंवा थेट शेतकरी असतील, त्यांच्याशी सविस्तर चर्चा करायला सरकारने पुढे यावे. एकदा निर्णय घेतला की तो पक्का असला पाहिजे. निकष, तत्वतःच्या गोंधळात कशाला पडायचे? 80 टक्के शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे म्हणता मग 20 टक्के लोकांनी काय केले आहे? त्यांच्यासाठी काय धोरण ठरवणार ते पण लागलीच सांगितले पाहिजे.''

ते म्हणाले, "सरकारतर्फे कुणी बोलायचे, हेही ठरले पाहिजे. मंत्री समिती आहे, अन्य लोक आहेत, प्रत्येकजण काहीतरी बोलून जातो आणि गोंधळ उडवून देतो. श्‍वेतपत्रिका काढली तर असे होणार नाही. कर्जमाफी कुणाला व कशी, हे निश्‍चितल करतानाच बॅंकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळणार आहे का, हेही सरकारने तपासले पाहिजे. अन्यथा, तो नवा गोंधळ होण्याची शक्‍यता आहे. सध्या सरकारने तातडीने खरीप हंगामात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याची भूमिका घ्यावी. हा हंगाम हाती आला तर शेतकऱ्यांचे समाधान होईल. कर्जमाफीच्या अभ्यासासाठी आणखी आठ-दहा दिवसांचा वेळ घेतला तरी हरकत नाही.''

खोत "सरकारी', शेट्टी डळमळीत
प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, "राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सरकारची भाषा बोलत आहे, ते आता चळवळीचे राहिले नाहीत. दुसरीकडे राजू शेट्टी यांची भूमिका तरी कुठे स्पष्ट आहे. ते सरकारसोबत आहेत, तरी भांडतात. तुम्ही सरकारमधून बाहेर पडा, मग भांडा. ही चळवळीची गरज आहे. कुणी चळवळ सोडली म्हणून ती थांबणार नाही, कारण याआधी अनेक चळवळींत फूट पडली, पण त्या संपल्या नाहीत. सदाभाऊंच्या भूमिकेनेही चळवळ थांबणार नाही.''