कारंदवाडीत राडा

कारंदवाडीत राडा

आष्टा - कारंदवाडी (ता. वाळवा) येथे महिन्यापूर्वी हॉटेलची उधारी देण्यावरून झालेल्या मारामारीत १० ते १५ तरुणांनी आज तलवार, कोयता, सत्तूर, गजांसह केलेल्या हल्ल्यात प्रतीक नितीन पाटील, सुनंदा नितीन पाटील, सुमीत राजेंद्र वाडकर, राजेंद्र वाडकर, मनोज वग्याणी, पद्‌मजा वग्याणी आदी जखमी झाले. हल्ल्यात तिघांची डोकी फुटली.

हात-पाय फ्रॅक्‍चर झाले. हल्लेखोरांनी घरात घुसून साहित्याची मोडतोड करीत हैदोस घातला. या प्रकरणाने कारंदवाडीत दोन गटांत तणाव निर्माण झाला आहे. गावात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. प्रतीक नितीन पाटील यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंमत पाटील, किरण पाटील, उदय पाटील, बंडा उतरे, सोन्या उतरे, वैभव पाटील, बजरंग कामीरे, विकास नेमाने यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे

कारंदवाडी येथील सर्वोदय पेट्रोलपंपाशेजारी मनोज तात्यासाहेब वग्याणी यांचे हॉटेल आहे. पाटील गटातील काही जण येथे जेवले, त्याची ३६० रुपये उधारी होती. उधारी मागण्यावरून ९ नोव्हेंबरला हॉटेल मालक मनोज व बंड्या उतरे यांच्यात वाद झाला. त्यानंतर सोन्या उतरे, बंड्या उतरे, हिंमत पाटील व मनोज वग्याणी, सुमीत वाडकर यांच्यात मारामारी झाली. वग्याणी यांनी पाटील गटाच्या एकाची गचांडी धरली. त्यामुळे प्रतिष्ठेचे बनले. बघून घेण्याच्या धमक्‍या झाल्या. 
त्यातून या दोन गटांत संघर्ष पेटला. प्रसंगावधान ओळखून ज्येष्ठांनी एका ग्रुपच्या तरुणांना १५ दिवस गावाबाहेर ठेवणे पसंत केले. 

दरम्यान, वाद मिटविण्यासाठी पलूस तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांबरोबर बैठका झाल्या. वाद मिटविलेही. चार दिवसांपूर्वी बाहेर असलेले तरुण गावात आले. पाटील गटाच्या कार्यकर्त्यांत चीड होती. आज सकाळी १० ते १५ जणांनी तलवार, सत्तूर, काठ्यांसह जयंत कॉलनी, वाडकर मळा येथील सुमीत वाडकर यांच्या घरावर हलला केला. तेथे सुमीत व त्याचे वडील राजेंद्र यांना बेदम मारहाण केली. सुमीतवर जीवघेणा हल्ला झाला. त्याच्या डोक्‍यात वर्मी घाव बसला. हात फ्रॅक्‍चर झाला. त्यानंतर तरुणांनी मोटारसायकलवरून सांगली रस्त्यावरील सर्वोदय पंपाशेजारील प्रतीक नितीन पाटील यांच्या घराकडे मोर्चा वळविला. हल्लेखोरांनी घरात शिरून प्रतीकवर हल्ला चढविला. डोक्‍यात, हात-पायावर मारहाण केली. त्याचा पाय, हाताचे बोट फ्रॅक्‍चर झाले. त्याची आई सुनंदा यांनाही मारहाण झाली.

शेजारचे मनोज वग्याणी हे येथे काय दंगा सुरू आहे, हे पाहण्यासाठी आले असता तरुणांनी त्यांच्यावरही हल्ला चढविला. सशस्त्र हल्ल्यात मनोज यांच्या डोक्‍यात वर्मी घाव बसला. त्यांचा हात फ्रॅक्‍चर झाला. हल्लेखोरांनी मनोज यांची आई पद्‌मजा यांनाही मारहाण केली. त्यात त्या जखमी झाल्या. त्यानंतर बेभान तरुणांचा जमाव चेतन अप्पासो वाडकर यांच्या घराकडे वळला. चेतन घरी नसल्याने हल्लेखोर पसार झाले. 

पोलिसांकडून पाहणी
बेभान हल्लेखोर, लागोपाठ तीन घरांवर झालेले हल्ले, तिघांची फुटलेली डोकी, मोडलेले हात-पाय, फिल्मी स्टाइलने झालेल्या मारामारीची बातमी गावभर पसरली. दोन गटांत तणाव निर्माण झाला. जखमींवर आष्टा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी सांगलीला हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलिस कारंदवाडीत दाखल झाले. चारही ठिकाणांची पाहणी केली. गावात दिवसभर पोलिस थांबून होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com