तासगावला ९ पासून बेदाणा व्यवहार बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

तासगाव - तासगाव कृषी बाजार समितीच्या  बेदाणा बाजारपेठेतील व्यापारी आणि शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण होईपर्यंत ९ ऑक्‍टोबर ते ४ नोंव्हेबरपर्यंत बेदाणा बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती आणि बेदाणा व्यापारी असोसिएशन यांच्या समन्वयातून घेतला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती रवींद्र पाटील यांनी दिली. 

दरवर्षी दिवाळीच्या आधी बाजार समिती आवारातील बेदाणा बाजारपेठेतील अडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दिले जाणाऱ्या बिलांचे व्यवहार पूर्ण (झिरो पेमेंट) केले जातात. यावर्षी बाजार समितीकडून शेतकरी व्यापारी येणे देणे व्यवहार पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. अडत व्यापाऱ्यांचे खरेदीदाराकडून येणे बाकी असलेल्या रकमांची माहिती बाजार समितीला देऊन सहकार्य करण्याचे आवाहन सभापती पाटील यांनी केले आहे. 

राज्यात दीड लाख टन बेदाणा उत्पादन झाले आहे. चालू हंगामामध्ये तासगाव बाजार समितीमध्ये ४३ हजार  ६५० टन बेदाण्याची विक्री होऊन ४५० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. तासगाव बेदाणा मार्केट मध्ये  बाजार समितीच्या धोरणामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर बेदाण्याचे पैसे मिळत असल्याने सांगली, सातारा, सोलापूर, शिवाय कर्नाटकातील  विजापूर, गुलबर्गा, अथणी येथून मोठ्या प्रमाणावर  बेदाणा विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. आवक दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर बाजार समिती आणि व्यापारी असोसिएशन यांच्या समन्वयातून व्यापारी आणि शेतकऱ्यांचे हित  पाहून वेळेवर पैसे खात्यामध्ये जमा केले जाणे फायद्याचे असल्याने यावर्षी बाजार समितीने झिरो पेमेंटसाठी  पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळाल्याची खातरजमा बाजार समितीकडून केली जाणार असल्याचेही सभापती पाटील यांनी सांगीतले. अडत व्यापारी,  खरेदीदार आणि शेतकरी यांचे येण्यादेण्याचे कसलेही व्यवहार शिल्लक ठेवू नयेत यासाठी ९ ऑक्‍टोबर ते ४ नोंव्हेबरपर्यंत बेदाणा सौदे बंद ठेवण्यात आल्याचेही ते म्हणाले.