आधीचे सरकार बरे होते... : राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

सांगली - आधीच्या सरकारला कंटाळून जनतेने देशात परिवर्तन केले; पण गेल्या साडेतीन वर्षांतील विद्यमान सरकारचा कारभार पाहता आधीचे सरकारच बरे होते, असे म्हणायची वेळ आल्याचे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत बोलताना केले. 

सांगली - आधीच्या सरकारला कंटाळून जनतेने देशात परिवर्तन केले; पण गेल्या साडेतीन वर्षांतील विद्यमान सरकारचा कारभार पाहता आधीचे सरकारच बरे होते, असे म्हणायची वेळ आल्याचे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत बोलताना केले. 

नेमिनाथनगरमधील राजमती भवनमध्ये जिल्हा स्थापत्य अभियंता संघटनेच्या (सुबे) अभियंता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार बच्चू कडू, संघटनेचे राज्य अध्यक्ष दिलीप मेडगे, राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र जाधव, मिरज  पश्‍चिम विभागचे कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण, महापालिकेचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्राध्यक्ष इंद्रजित साळुंखे आदी उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘आजपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी आंदोलन केली. आता पदवीधर अभियंत्यांच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ  आली आहे. सरकारने जीएसटी आणला, पण याचा नेमका घोळ समजत नाही. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचे धोरण असल्याचा दावा सरकार करते. पण कुठे आहे ते? यांचे धोरण फक्त पहिल्या रांगेतील घटकांसाठीच आहे. परिवर्तनाची संधी लवकरच येणार आहे. राज्यव्यापी संघटनेने एकजुटीने आंदोलन केले. तर तुमचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो.’’

आमदार बच्चू कडू म्हणाले, ‘‘गेले अडीच महिने काम बंद करून तुम्ही गांधीगिरीने आंदोलन करत आहात, मात्रा आता भगतसिंगगिरी करण्याची वेळ आली आहे. तुम्ही पदवीधर मतदारसंघासाठी मतदान आधी करत नव्हता आणि आता केले तर चंद्रकांत पाटील यांना निवडून दिले आहे. तेच तुमचे प्रश्‍न सोडवू शकत नाहीत. बांधकाम विभागातील फाईल ठेकेदारपासून ते मंत्र्यापर्यंत कशी  जाते यावर एक चित्रपट निघेल अशी स्थिती आहे.’’ यावेळी अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन महावीर पाटील, हिंमत कोळी, प्रवीण कोले, अतुल बेले, पृथ्वीराज पवार, जयराज बर्गे, हेमंत मोरे यांनी केले.

Web Title: sangli news raju shetty comments