बायकांच्या भानगडी असतील तर त्याही छापा:  राजू शेट्टी

जयसिंग कुंभार
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

माझ्या भानगडी सदालाच विचारा, तुम्हीही शोधून काढा. असल्या काही बायकांच्या भानगडी तर त्याही छापून टाका.

सांगली : माझ्या भानगडी मलाच विचारण्यापेक्षा सदालाच विचारा. असल्या काही बायकांच्या भागनडी तर त्यादेखील छापा, असा उपहासात्मक टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी लगावला.

एकेकाळचे घनिष्ठ राजकीय सहकारी असलेल्या राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल खासदार शेट्टी यांच्याविरोधात प्रथमच थेट आरोप करताना "आर-पार'च्या लढाईचे रणशिंग फुंकले. "तुमच्या अनेक भानगडींचा मी साक्षीदार आहे'.. असा सूचक इशारा दिला होता. फलटण येथे निघालेल्या खासदार शेट्टी यांनी सदाभाऊंच्या या आरोपांची खिल्ली उडवली. 

खोत यांनी काल सांगलीत पत्रकार परिषदेत भविष्यातील लढाई किती टोकाला जाऊ शकते याची चुणूकही दाखवली. त्यात त्यांनी शेट्टींनी हातकणंगले मतदार संघाबाहेर निवडणूक लढवून दाखवावी मग ताकद कळेल, संघटनेत त्यांची हुकुमशाही आहे. इतरांनी मोठे झालेले त्यांना बघवत नाही, माझ्या मंत्रीपदाचा निर्णय भाजप करेल, सरकारमधून बाहेर पडायला मुहुर्ताची वाट कशाला बघता अशी टिकाटिप्पणी करीत आरोपांची माळ लावून दिली होती. याविषयी शेट्टींकडे विचारणा केली असता त्यांनी उपहासात्मक खोच मारली.

ते म्हणाले, "माझ्या भानगडी सदालाच विचारा, तुम्हीही शोधून काढा. असल्या काही बायकांच्या भानगडी तर त्याही छापून टाका.'' हातकणंगलेबाहेर लढण्याचे आव्हान तुम्ही स्विकारणार का या प्रश्‍नावर ते म्हणाले, "मी कुठं लढायचं हे कुणी शिकवायची गरज नाही. मला ते कळतं. '' महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आलेल्या मंत्रीपदाच्या ऑफरवर ते म्हणाले, "मला त्यात काडीचा इंटरेस्ट नाही.'' 

Web Title: Sangli news Raju Shetty criticize Sadabhau Khot