सांगली जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

सांगली जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

सांगली - जिल्ह्यात ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जुना बुधगाव रस्त्यावरील ईदगाह मैदानावर सकाळी हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज पठण केली. सांगली, मिरजसह जिल्ह्यात विविध ठिकाणी ईदची नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यानंतर राजकीय नेत्यांसह समाजातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

ईदगाह मैदान येथे सकाळी नऊ वाजता हाफिज रऊफ यांनी ईदची नमाज पठण केली. या वेळी खतुबा पठण मौलाना एजाज खान यांनी केले. तर हाफिज इस्माईल यांचे प्रवचन झाले. त्यांनी राष्ट्रीय एकता आणि बंधुता अखंड राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, श्रीमती जयश्री पाटील, पोलिस उपाधीक्षक दीपाली काळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय बजाज, तसेच महापालिकेचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईदगाह मैदानावरील नमाजचे नियोजन अध्यक्ष महापौर हारुण शिकलगार, सचिव मुन्ना कुरणे, इस्ताक मेस्त्री, अल्ताफ जमादार, कय्युम पटवेगार, युसुफ जमादार, आसिफ बावा, लालू मेस्त्री, निसार संगतरास आदी मुस्लिम बांधवांनी केले.

मिरजेत रमजान ईद उत्साहात
मिरज - शहरात रमजान ईदचा सण उत्साहात साजरा झाला. चाळीसहून अधिक मशिदींमध्ये नमाज पढण्यात आली. मुख्य नमाज पठण ईदगाह मैदानावर झाले. या वेळी हजारो मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली. 

महिन्याभराच्या उपवासानंतर काल चंद्रदर्शन झाल्याने आज ईद जाहीर करण्यात आली. काल रात्रीपर्यंत खरेदीसाठी शहरातील बाजारपेठा गजबजल्या होत्या. आज सकाळपासूनच ठिकठिकाणी नमाज पठणासाठी गर्दी झाली होती. दर्गा मशीद, जहन्नासाब दर्गा मशीद, हत्तीवाले मशीद यांसह चाळीसहून अधिक मशिदींमध्ये नमाज पठण झाले. ईदगाहवरील नमाज पठण सकाळी साडेनऊ वाजता जाहीर झाले होते. त्यानुसार शहरातून ईदगाहवर श्रद्धाळूंची रांग लागली. पोलिसांनी वाहतूक बंद ठेवून रस्ता मोकळा ठेवला. खुदबा पठण, संदेश वाचन व नमाज पठण हे विधी सुमारे तासभर चालले. भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक धीरज पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील, माजी आमदार हाफीज धत्तुरे, तसेच शरद पाटील आदी उपस्थित होते. आज दिवसभर शिरकुर्म्याची देवाण-घेवाण झाली. दुपारच्या नमाज पठणासाठीही मशिदींमध्ये गर्दी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com