‘आरपीआय’चा दलित चेहरा बदलणार - रामदास आठवले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

सांगली - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला आता आपला दलित चेहरा बदलावा लागेल. पक्षात अन्य समाजातील प्रतिष्ठित मंडळींना स्थान द्यावे लागेल, तरच आमचा निवडणुका जिंकणारा पक्ष होईल, असे जाहीर करीत पक्षाचे नेते, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज पक्षात सोशल इंजिनिअरिंगचे संकेत दिले. 

सांगली - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला आता आपला दलित चेहरा बदलावा लागेल. पक्षात अन्य समाजातील प्रतिष्ठित मंडळींना स्थान द्यावे लागेल, तरच आमचा निवडणुका जिंकणारा पक्ष होईल, असे जाहीर करीत पक्षाचे नेते, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज पक्षात सोशल इंजिनिअरिंगचे संकेत दिले. 

येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेची घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘मी अनेक वर्षे काँग्रेसबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहिलो. त्यातून एक शिकलो, इतरांच्या कुबड्या घेऊन राहणे घातक असते. दुसऱ्याच्या भरवशावर राहायचे दिवस संपले. स्वतःची ताकद वाढवली पाहिजे. रिपाइं आता निवडणुका जिंकणारा पक्ष झाला पाहिजे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत आपापले मतदारसंघ तयार केले पाहिजेत. निवडून येणारी माणसे पक्षात घेतली पाहिजेत. इतर समाजाला स्थान देण्याचा मी निर्णय घेतला आहे. बहुजनांचा पक्ष असा शिक्का पुसून ताकद वाढवू.’’

विवेक यांची वाट पाहतोय
श्री. आठवले म्हणाले, ‘‘जिल्ह्यात पक्षाचे काम बरे सुरू आहे. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे हेच अध्यक्ष आहेत. इतर कुणी अध्यक्षपद लावायची गरज नाही. माजी महापौर विवेक कांबळे पक्षात येतील, याचीही मी वाट पाहतोय.’’

कार्यकर्त्यांची बाजू घ्या
रिपाइंचे जिल्ह्यातील नेते एखाद्या प्रकरणात शासकीय अधिकाऱ्यांची बाजू घेऊन कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात, अशा कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत. त्याविषयी आठवले यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी जपून योजनांचा फायदा घ्यावा, मात्र आधी कायकर्त्यांची बाजू घ्यावी, असे स्पष्ट सांगितले.

प्रभागपद्धतीला रिपाइंचा विरोध
महापालिका निवडणुकीतील प्रभागपद्धतीला रिपाइंचा विरोध असल्याचे मत श्री. आठवले यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘ही पद्धत बदलावी लागेल. ती चुकीची आहे.’’