आरटीओचा ब्रेक तपासणी ट्रॅक पाटगावला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

सांगली आरटीओंच्या पाठपुराव्याला यश, जागा देण्याचा ग्रामपंचायतीचा ठराव
सांगली - आरटीओ कार्यालयाला वाहनांच्या ब्रेक तपासणी ट्रॅकसाठी काही वर्षांच्या पाठपुराव्यानंतर मिरज-पंढरपूर महामार्गावरील पाटगाव (ता. मिरज) येथे जागा मिळाली. १३ हेक्‍टरपैकी ४ हेक्‍टर जागा आरटीओ कार्यालयास देण्याबाबत ग्रामपंचायतीने ठराव केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ताबा मिळणे बाकी आहे.

आरटीओ कार्यालयात प्रतिवर्षी परवाना नूतनीकरणासाठी येणाऱ्या वाहनांची ब्रेक तपासणी करावी लागते. कुपवाड एमआयडीसीत रहदारीच्या रस्त्यावर ब्रेक तपासणी केली जाते. परंतु बऱ्याचदा एमआयडीसीमधील रस्त्यावर तपासणी घेताना अडथळा येणार नाही किंवा अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. दररोज २०० गाड्यांची ब्रेक तपासणी करून प्रमाणपत्र दिले जाते. ब्रेक तपासणीसाठी एखादा रस्ता किंवा ३०० मीटर लांब जागा मिळावी म्हणून आरटीओ कार्यालयामार्फत प्रयत्न सुरू होते. रहदारीच्या रस्त्याऐवजी स्वतंत्र जागेत ट्रॅक निर्माण करावा याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना होत्या.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले आणि सहकारी काही महिन्यांपासून जागेचा शोध घेत होते. अखेर मिरज-पंढरपूर महामार्गावरील पाटगावात खुली  जागा असल्याचे समजले. मिळालेल्या १३ हेक्‍टरपैकी ४ हेक्‍टर जागा ट्रॅकसाठी निश्‍चित केली आहे. या जागेच्या ताब्याबाबत ग्रामपंचायतीला कळवले गेले. ग्रामसभेत ठरावही नुकताच मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम ताबा मिळणे फक्त बाकी आहे. ताबा मिळाल्यानंतर तत्काळ तेथे ट्रॅक  निर्माण केला जाईल.

आरटीओ अधिकाऱ्यांना ब्रेक तपासणीसाठी दररोज कसरत करावी लागते. परंतु आता जागेचा प्रश्‍न सुटल्यामुळे ब्रेक तपासणी व्यवस्थिपणे पार पाडता येईल. शहरापासून थोड्याशा अंतरावर ही जागा असल्यामुळे रहदारीला कोणताही अडथळा येणार नाही. पाटगावच्या बाहेर जागा असल्यामुळे नागरिकांनाही त्रास होणार नाही.

अद्ययावत ट्रॅक
ब्रेक तपासणीचा ट्रक ३०० मीटर लांब असणार आहे. वाहन पार्किंगसाठी जागा निश्‍चित असणार आहे. ट्रॅकवर दोन्ही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे रोखले जाणार आहेत. वेगाने आलेला ट्रक ब्रेक मारल्यानंतर किती अंतरावर जाऊन थांबतो, हे तपासले जाईल. त्याचे िव्हडिओ शूटिंगदेखील होईल. तपासणीत वाहनाचा ब्रेक उत्तम आहे की नाही हे समजेल.