शेट्टी लक्षात ठेवा; तुमच्या भानगडींचा मीच साक्षीदार - सदाभाऊ खोत 

शेट्टी लक्षात ठेवा; तुमच्या भानगडींचा मीच साक्षीदार - सदाभाऊ खोत 

सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज प्रथमच खासदार राजू शेट्टी यांच्यावर तोफ डागली. तुमच्या साऱ्या भानगडींचा मी साक्षीदार आहे, असा सूचक इशारा दिला आहे. माझ्या मंत्रिपदामुळे पोटशूळ उठलेल्या शेट्टींची आत्मक्‍लेश यात्रा कर्जमाफीसाठी नव्हे, तर सदाभाऊ द्वेषासाठी होती. त्यांना सदाभाऊ क्‍लेश झाला असून आता त्यांनी माझ्या पाठीमागे लागण्यापेक्षा शेतकरी प्रश्‍नांकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही दिला. हिंमत असेल तर हातकणंगले मतदारसंघ सोडून निवडणूक लढवून दाखवावी; मग त्यांना शेतकरी संघटनेची ताकद कळेल, असे जाहीर आव्हानही त्यांनी दिले आहे. 

स्वाभिमानीतून हाकलपट्टी होईपर्यंत गेल्या काही महिन्यांत मंत्री खोत संघटनेच्या टीकेच्या रडारवर सातत्याने आहेत. प्रत्युत्तरादाखल आजवर मोघमात आणि जपून टीका करणाऱ्या खोत यांनी पत्रकार परिषदेत मात्र शेट्टींवर टीकेचे आसूड ओढले. ते म्हणाले,""मला गद्दार म्हणता; मग शरद जोशींच्या संघटनेतून बाहेर पडलात; तेव्हा तुम्ही काय साधू संत होता का? माझी आमदारकी-मंत्रिपद भाजपच्या कोट्यातून आहे. त्यामुळे माझ्या राजीनाम्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकारच नाही. भाजपच योग्य तो निर्णय घेईल. आम्ही तुमचे गुलाम नाही. सरकारमध्ये राहता आणि पुन्हा सरकारवरच दबाव आणता. सरकारमधून बाहेर पडण्याचे दररोज इशारे देताय तर मग आता कोणत्या मुहूर्ताची वाट बघताय?'' 

ते म्हणाले,""चळवळीसाठी साखर सम्राटांच्या काठ्या खाल्या; तेव्हा सदाभाऊ चांगला. आता मात्र तो गद्दार. कोणी मोठा झालेला यांना बघवतच नाही. आमदार उल्हास पाटील मोठा झाला की तो नको, सदाभाऊ मोठा झाला की तोही नको. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हेतूपूर्वक विरोध, शरद जोशींना विरोध करताना मीच एकटा हुश्‍शार. असा गर्व शेतकऱ्यांच्या नेत्याला शोभत नाही. संघटनेतून बाहेर पडण्याची माझी इच्छा नव्हती; परंतु त्यांची संघटनेतील हुकूमशाही अतिच झाली. केवळ वैयक्तिक द्वेषापोटी त्यांनी माझी हकालपट्टी केली. त्याची पूर्वतयारी म्हणूनच त्यांनी आत्मक्‍लेश यात्रा काढली. त्याचा कर्जमाफीशी संबंध नव्हता. केवळ माझ्याविरोधातील ती "सदाभाऊ द्वेष यात्रा' होती.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com