शेगावच्या तरुणाचा घातपाताचा संशय

शेगावच्या तरुणाचा घातपाताचा संशय

जत - शेगाव (ता. जत) येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सागर शहाजी बोराडे (वय २३) हा तरुण जागीच ठार झाला होता. परंतु, त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी रोहित भोसले (रा. अंतराळ, ता. जत) या ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे. 

याबाबतची माहिती अशी, की बस स्थानकावर सागर बोराडे याची मोबाईल शॉपी आहे. रात्री दहा वाजता शॉपी बंद करून तो घरी चालला होता. गावातीलच अनिल शंकर बोराडे यांनी सागरला माझ्याकडे गाडी नाही, घरी सोड, असे सांगितले. अनिलचे घर शेगावपासून दीड किलोमीटरवर आवंढी रस्त्यावर आहे. सागर अनिल यांना सोडण्यासाठी मोटारसायकल (एमएच-११ -एएक्‍स ९०७७) ने शेगाव- आवंढी मार्गावर गेला. 

यावेळी अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकलला मागून धडक दिली. धडक इतकी जबर होती, की मागे बसलेले अनिल बाजूला पडून गंभीर जखमी झाले, तर सागर पाचशे मीटरपर्यंत फरफटत गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत विजयकुमार धोंडीराम बोराडे यांनी जत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अपघातानंतर सागरच्या आई व वडिलांनी सागरचा अपघात नव्हे तर खून आहे, असा संशय व्यक्त केला आहे. सरपंच व ग्रामस्थांनी सागरला उडवणाऱ्या ट्रकचा पाठलाग केला.

पुणे येथील लोणी काळभोर येथील बालाजी रोडलाइन्स येथून ट्रकचालक रोहित भोसलेला ताब्यात घेत जत पोलिसांच्या स्वाधीन केले. ज्या ट्रकने (एमएच १२- एमव्ही ९४७३) सागरला उडवले त्याचा पुढील भाग चेपला आहे. पुढील टायरवर रक्ताचे डागही दिसल्याचे सरपंचांनी पोलिसांना सांगितले. घटना व उलगडत असलेल्या रहस्यांमुळे पोलिसही चक्रावलेत. गुरुवारी दिवसभर जत पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संशयित चालकाची चौकशी केली. त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढले आहेत. सागरचा घातपात झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. त्या दिशेने तपास केला जात असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक राजेंद्र माने यांनी सांगितले.
 
बांधकामाचे कारण...
सागर बोराडे याच्या घराचे बांधकाम सुरू आहे. हे काम लोहगाव येथील एका ठेकेदारास दिले होते. काम अर्धवट राहिल्याने सागरच्या वडिलांनी ठेकेदाराचा हिशेब केला. त्याच्याकडे एक लाख रुपये अधिक उचल निघाली. सागरच्या वडिलांनी लोहगावच्या ठेकेदाराकडून काम काढून घेत पैसे परत देण्यासाठी तगादा लावला होता. पैसे नसल्याने तीन दिवसांपूर्वी ठेकेदाराने मोटार बोराडे यांच्या ताब्यात दिली. बोराडे यांनी मोटार ताब्यात घेत शेगावच्या पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही असल्याने तेथे लावली होती. बांधकामाच्या कारणावरून मेहुण्याची मोटार बोराडेंच्या ताब्यात असल्याने नाराज असलेल्या रोहितने शेगावपासून दीड किलोमीटरवर शेगाव- आवंढी रस्त्यावर सागर जात असलेल्या मोटारसायकलला धडक दिली. धडकेनंतर सागरचा मृतदेह पाचशे फूट फरफटत नेल्याने सागरचा जागीच मृत्यू झाला. सागरवर पाळत ठेवून हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ट्रकचालकाचा पाठलाग 
मोटारसायकलला धडक दिलेला ट्रक शेगाव येथील पेट्रोप पंपावर होता. सरपंचांचीही वाहने तिथेच लावली होती. सागरचा अपघात, वादाची माहिती सरपंच पाटील यांना असल्याने त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. पेट्रोल पंपावर ट्रक नसल्याने संशय बळावला. सरपंच रवींद्र शिंदे, बंडू शिंदे, अनिल माने, हरिश्‍चंद्र शिंदे, नवनाथ मोहिते, बबन बोराडे, संतोष झुरे यांनी तत्काळ ट्रकचा पाठलाग केला. ट्रक डिकसळ (ता. सांगोला)मार्गे जतला व जत येथून पुण्याला गेल्याचे समजले. लोणीकाळभोर येथील बालाजी रोडलाईन्सच्या कार्यालयासमोर तो दहाचाकी ट्रक (एमएच १२- एमव्ही ९४७३) सापडला. चालक रोहित भोसले याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com