वाळूतस्कराची तलाठ्याला मारहाण

वाळूतस्कराची तलाठ्याला मारहाण

दिघंची - बेकायदा वाळू वाहतुकीस विरोध केल्याप्रकरणी माडगुळे (ता. आटपाडी) येथील तलाठी उत्तम विश्‍वनाथ जानकर यांना मारहाण करण्यात आली; तर दिघंचीचे मंडळ अधिकारी पांडुरंग कोळी व कोतवाल शिवाजी पुसावळे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

ही घटना शनिवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान घडली. माडगुळेचे तलाठी उत्तम जानकर यांनी याबाबत आटपाडी पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी गाडीचे मालक नितीन मारुती जाधव आणि चालक अजय जाधव व अज्ञात व्यक्ती (सर्व रा. देवापूर, ता. माण, जि. सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी - शनिवारी सकाळी आठच्या सुमारास तलाठी उत्तम जानकर, मंडल अधिकारी पांडुरंग कोळी व कोतवाल शिवाजी पुसावळे हे तिघे दिघंची येथील चौकात बेकायदा वाळू वाहतूक विरोधात कारवाईसाठी थांबले होते. त्यांना पांढरेवाडी (दिघंची) येथे बेकायदा वाळू उपसा सुरू असल्याची माहिती आटपाडी तहसीलदार यांच्याकडून मिळाली. त्यानंतर महसूलचे कर्मचारी दुचाकीवरून कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांना रानमळा (दिघंची) येथे पांढऱ्या रंगाची पिकअप वाळूने भरलेली दिसली. त्या वेळी वाहनचालकाने वाळूचा परवाना नसल्याचे सांगितले. ही गाडी नितीन जाधव या व्यक्तीची असल्याचे सांगितले. 

माणगंगेतून वाळू उपसा
आटपाडी तालुक्‍यातील माणगंगा नदीतून बेसुमार  बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. वाळू उपशामुळे नदी पात्रात मोठ मोठे खड्डे पडले आहे. वाळू तस्करीतून जादा पैसा मिळत असल्याने तालुक्‍यातील युवक तस्करीच्या विळख्यात सापडला आहे. महसूल पथकाने वाळू तस्करीला अनेक वेळा आळा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र राजकीय नेत्यांच्या दबावामुळे कारवाईला खीळ बसत  आहे.

परवाना नसल्याने बेकायदा वाळू असलेली गाडी आटपाडीला घेऊन जाण्यासाठी तलाठी उत्तम जानकर हे त्या गाडीत बसले आणि मंडल अधिकारी पांडुरंग कोळी व कोतवाल शिवाजी पुसावळे हे दुचाकीने पिकअपच्या मागे गेले. त्या वेळी मागून येणाऱ्या अनोळखी व्यक्तीने मंडल अधिकारी व कोतवाल यांच्या गाडीला लाथ मारून खाली पाडले व आमच्या गाडीचा पाठलाग केला तर गाडी अंगावर घालून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आटपाडी पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com