सांगलीः वाळूवर पोसले वळू अन्‌ सरकारी जळू

अजित झळके
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

तस्करीच्या प्रश्‍नाला फाटा ः जीवघेण्या हल्ल्यानंतरही चोरांनाच अभय

तस्करीच्या प्रश्‍नाला फाटा ः जीवघेण्या हल्ल्यानंतरही चोरांनाच अभय

सांगली: कडेगाव आणि पलूस पट्टयातील वाळू तस्करी प्रकरणातून मानापमानाचे "सरकारी वगनाट्य' सुरू आहे. कडेगाव प्रांतानी कुंडलच्या तलाठ्याला अर्वाच्च शिवीगाळ केली, त्यांचा निषेध करण्यासाठी तलाठी एकवटले. अकोल्यातील एका तलाठी म्होरक्‍याने प्रांतांचा एक काकण चढ्या अर्वाच्च शब्दांत उद्धार केला. वाळू तस्करीत जिल्हाभरातील राजकीय नेत्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत अनेक "वळू' पोसलेले आहेत. एरवी कुणी कुणाला दुखावत नाही, यावेळी "गलती से गलती की...' असा प्रकार झाल्याचे खुद्द प्रांतांनीच कबूल केलं आहे. मूळ मुद्दा बाजूला ठेवून सारा "काळू-बाळू'चा प्रकार आहे.

सध्या वाळूचा दर आठ हजार रुपये ब्रास आहे. एक ट्रक वाळूला जवळपास 50 हजार रुपये मोजावे लागतात. ही वाळू कुठून येते? ती इतकी भडकली कशी? कसे ठरताहेत सध्याचे दर? "रॉयल्टी' किती आणि कुठे भरली जाते? मिरज-पंढरपूर आणि विटा-सांगली रस्त्यावरून वाळूच्या ट्रक ताडपरी झाकून कुठे जातात? त्यांचे डेपो कुठे आहेत? जत, तासगाव, कवठेमहांकाळ, कडेगाव, पलूस पट्टयात जेसीबी यंत्र आणि ट्रॅक्‍टर, ट्रकचा रात्रीत खेळ कसा चालतो? प्रमुख शहरांसह जिल्हाभर बांधकामांचा सपाटा सुरू आहे. वाळू उपशावर नियंत्रण असेल तर मग या बांधकामाला माती वापरली जातेय का? उत्तर सरळ आहे, वाळूचा बेसुमार उपसा होतोय. जतपासून कडेगावपर्यंत आणि विट्यापासून वाळव्यापर्यंत वाळू, खडी, मुरूम, दगडाचा जोरात धंदा तेजीत आहे. महसूल यंत्रणेत स्वच्छ हात शोधून सापडणे कठीण आहे.

प्रांतांनी तलाठ्याला शिवीगाळ केली काय अन्‌ तलाठ्यांनी प्रांतांना जाब विचारला काय, मूळ मुद्द्याला कुणी हातच घातलेला नाही. कुंडल येथील वाळू तस्करी या विषयावर कोण बोललेच नाही. कुंडल हे हिमनगाचे अत्यंत छोटे टोक आहे. कृष्णा, वारणा, येरळा, नांदणी, अग्रणी, बोर कुठल्याही नदीत गेला तरी त्या बेसुमार वाळू उपशाची साक्ष देतात. दोन्ही काठ कातरलेले सापडतात. मग, ही यंत्रणा झोपा काढते का? अजिबात नाही, ती दक्ष असते. किती उपसा होतो आणि आपला हिस्सा त्यानुसार मिळतो की नाही, यासाठी ही दक्षता असते. एखाद्या नाजूक क्षणी कुठला तरी अधिकारी कुठल्या तरी तलाठ्याला बोलतो अन्‌ पचका होतो. मग तोही "अनावधानानं झालं, चुकलं', अशी उत्तर देऊन हात काढून घ्यायला बघतो. कुंडल प्रकरणातील दोन्ही ध्वनिफिती याच व्यवस्थेचं उघडं-नागडं दर्शन घडविणाऱ्या आहेत.

दलबदलू ठेकेदार
कडेगाव, पलूस, जत, कवठेमहांकाळ तालुक्‍यांत राजकीय फड रंगात येतो तेव्हा वाळू तस्करीचा विषय निघतो. कॉंग्रेसवाले राष्ट्रवादीवाल्यांवर, भाजपवाले कॉंग्रेसवर वाळू तस्करांना पोसणारे म्हणून टीका करतात. हे वाळूवर पोसलेले ठेकेदार सत्तेसंगे आपला पक्ष बदलत असतात. गेल्या तीन वर्षांतील "इनकमिंग-आऊटगोईंग'चे रेकॉर्ड काढले तर दल बदलणाऱ्यांत वाळू ठेकेदार अधिक सापडतील. त्यांना पक्षाच्या विचारांशी देणे-घेणे नसते. सत्तेचा वरदहस्त झाला की महसुली यंत्रणा हात लावत नाही, धंदा चालतो, हा विश्‍वात त्यांच्यात निर्माण झाला आहे. तो "पार्टी वुईथ डिफरन्स'मधेही कायम आहे.

शिवीगाळचं बघाच, पण कारवाई कधी?
कडेगावच्या प्रांतांनी कुंडलच्या तलाठ्याला अर्वाच्च शब्द वापरून वाळू तस्करीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, पण, त्यांनी स्वतः मैदानात उतरून कारवाई केली नाही. त्यापलीकडे जाऊन प्रातांनी नम्रपणे "चुकून बोललो', अशी कबुली दिली आहे. ते चुकलेत हे खरंच आहे, वर्षानुवर्षे चालत आलेल्या व्यवस्थेविरुद्ध बोलायचं धाडस त्यांनी केल आहे. आता आणखी एक चूक करा, वाळू तस्करांवर कारवाई करा, अशी मागणी या पट्टयातून करण्यात येत आहे.

जीव गेल्यावरच यंत्रणा शहाणी होणार?
* जत तालुक्‍यात उमदी, बालगाव, शिंगणहळ्ली, शेगाव या ठिकाणी तहसीलदार, कोतवाल, तलाठ्यांवर हल्ला झाला होता. जत शहरात सर्कल आणि तलाठ्यांवर हल्ला. बेवणूरमध्ये तहसीलदारांवर सर्कल, तलाठी यांच्या गाड्या फोडल्या होत्या.
* कडेगाव तालुक्‍यात वांगी येथे नायब तहसीलदार, तलाठी यांच्यावर ट्रॅक्‍टर अंगावर घालून खुनाचा प्रयत्न केला होता.
* तासगाव तालुक्‍यातील शिरगाव येथे तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्‍टर घालण्याचा प्रयत्न. तक्रार करणाऱ्या एका राजकीय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.
* खानापूर तालुक्‍यात राजापूर येथे वाळू तस्करीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर वाळू तस्करांच्या टोळीने हल्ला केला होता. हिंगणगादे येथे महसुली कर्मचाऱ्यांना तस्करांनी पाठलाग करून हुसकावून लावले होते.
* पलूस तालुक्‍यातील नागठाणे येथे कृष्णा नदीतून बेसुमार वाळू उपसा करताना ठेकेदारांकडून दमदाटीची भाषा सतत सुरू असते.

कुंडलमधील तस्करीची उच्चस्तरीय चौकशी करा
कुंडल येथील रणसंग्राम फाऊंडेशनने कुंडल येथील वाळू तस्करीची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी केली आहे. पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांना निवेदन दिले आहे. या प्रकरणात तातडीने आणि गांभीर्याने तपास झाला पाहिजे, अशी मागणी अध्यक्ष ऍड. दीपक लाड यांनी केली आहे. यावेळी रामचंद्र लाड, विश्‍वजित लाड, अरुण सुतार, वसंत धर्माधिकारी उपस्थित होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
व्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले 
नदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा 
केशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार
रस्ते कामाबाबत चीनचे "गोलमाल'
कांद्याच्या भावाला लगाम बसणार
पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 
प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले
मुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी 
'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन