सांगलीचा राजवाडा सरकारचाच - जिल्हाधिकारी गायकवाड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

सांगली - सांगली संस्थानची ओळख असलेल्या येथील राजवाड्यासह परिसर हा विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या मालकीचा नसून, त्याची मालकी महाराष्ट्र शासनाकडे आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्या काळी राजांशी झालेला पत्रव्यवहार प्रशासनाकडे उपलब्ध असून त्यानुसार इथल्या इमारती आणि जागांची मालकी शासनाकडेच राहणार आहे. केवळ दरबार हॉल राजांच्या मालकीचा आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

राजवाड्यातील इमारतीत सुरू असलेली प्रशासकीय कार्यालये सध्या नव्या इमारतीत स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामागे राजवाड्यासह अन्य इमारती राजांकडे हस्तांतरित होण्याचे कारण आहे का? किती वर्षांचा करार आहे, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर गायकवाड यांनी हा खुलासा केला.

ते म्हणाले, 'स्वातंत्र्यानंतर सर्व राजांना पत्रव्यवहार केला होता. त्यात असा उल्लेख होता, की "देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे प्रशासन राबवण्यासाठी इमारतींची आवश्‍यकता आहे. तहसील कार्यालये, न्यायालये व अन्य व्यवस्था राजांकडे असलेल्या इमारतींमध्ये करायची आहे. या इमारती राजांनी लोकांकडून महसूल गोळा करून बांधलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची मालकी खासगी असू शकत नाही. महसूल जमा झाल्यानंतर त्यातील किती पैसे खासगी वापरावेत, याला मर्यादा होत्या. याशिवाय, जर सरकारला भविष्यात या जमिनींची गरज राहिली नाही आणि त्या विकायच्या ठरल्या, तर त्याच्या खरेदीचा पहिला हक्क राजांचा राहील.' यासंबंधीची सर्व कागदपत्रे आम्ही तपासलेली आहेत. त्यामुळे या इमारतींसह जागेची मालकी शासनाचीच आहे.''

अफवा माझ्याही कानावर
राजवाड्याची इमारत आणि जागा 99 वर्षांच्या कराराने शासनाने घेतली होती अन्‌ हा करार लवकरच संपतोय, त्याआधीच या जागेचा व्यवहार एका बड्या राजकीय नेत्याशी झालाय, अशी चर्चा सांगलीभर पसरली आहे. नवे जिल्हाधिकारी कार्यालय बांधणे, घाईघाईत उद्‌घाटन करणे, यामागे तेच कारण आहे, असे सांगितले जात होते. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी या साऱ्या फक्त अफवा असून त्या माझ्याही कानावर आहेत, असे स्पष्ट केले.