थेट सरपंच निवडीमुळे एकेक मत झाले महत्त्वाचे

Gram Panchayat
Gram Panchayat

विटा : खानापूर तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे  वातावरण चांगलेच तापले आहे.  सर्वच गावातील सरपंच आणि  सदस्यपदासाठी उभारलेल्या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. थेट जनतेतूनच सरपंच निवड होणार असल्यामुळे एकेक मत महत्वाचे आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात विखुरलेल्या गलाईबांधवांना
मतदानासाठी येण्याचे उमेदवारांबरोबरच नेतेमंडळीकडून साकडे घातले जात आहे.

खानापूर तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींसाठी 16 आॅक्टोबरला मतदान होत आहे. 45 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या 45 जागांसाठी 122 तर सदस्य पदाच्या 379 जागांसाठी 766 उमेदवार असे एकूण 888 उमेदवार निवडणूकीच्या रिंंगणात आहेत. गावपातळीवर कार्यकर्त्यांनी सोयीच्या स्थानिक आघाड्या केल्या आहेत. सर्व गावात सध्या ऐन ऑक्टोबर हिटमध्ये "इलेक्शन फिव्हर" चांगलाच तापला आहे. गावोगावी कार्यकर्ते आणि प्रचार यंत्रणेच्या लवाजम्यासह रॅली काढून दारोदारी, घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. रात्रीच्यावेळी कॉर्नरसभा, बैठका घेतल्या जात आहेत.  

निवडणुकीची रणनीती आणि  यंत्रणा राबविण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांसह गुप्तबैठकाचे सत्र सुरू आहे. दरम्यान प्रचार यंत्रणेबरोबरच राजकीय पंडितांकडून स्थानिक समीकरणांवर चर्चा करत आडाखे बांधत मतदानाची आकडेमोड सुरु आहे.

पहिल्यांदाच थेट जनतेतूनच सरपंचपदाची निवड होत असल्याने यावेळच्या ग्रामपंचायत निवडणूकीला विशेष महत्त्व आले आहे. यंदाची ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची बनली असल्याने मतदारयादीतील प्रत्येक मतदाराचा शोध घेतला जात आहे. तालुक्यातील अनेक भूमिपुत्र गलाई व्यवसायाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंबासह देशभरात जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत प्रांतात स्थायिक झाला आहे. परंतु गावाकडेच मतदार म्हणून मतदारयादीत नाव आहे. तालुक्यातील सर्वच गावात प्रत्येक घरात एक - दोघे तर संपूर्ण कुटुंबच मतदार आहेत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अटीतटीच्या आणि चुरशीच्या होत असलेल्या यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूकीत प्रथमच गलाईबांधवांची मते निर्णायक ठरणार असल्यामुळे त्यांच्या मतांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदाच राजकीय नशीब आजमावणाऱ्या अनेक उमेदवारांबरोबरच दिग्ग्ज नेतेमंडळीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रतिष्ठा राखण्याबरोबरच ग्रामपंचायतीची सत्ता मिळविण्याचे "टार्गेट" घेऊन दोन्ही गटाची यंत्रणा अलर्ट झाली आहे. मतदारयादीतील प्रत्येक मतदाराचा शोध घेऊन त्याच्याशी संपर्क साधला जात आहे. मतांची गोळाबेरीज सुरु असून जास्तीत - जास्त मतदान आपल्या उमेदवाराला मिळेल या दृष्टिकोनातून संपर्क मोहिम राबविली जात आहे. गलाईबांधवांना मतदानासाठी येण्याची साद उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून घातली जात आहे. काही मतदारांना गावी येण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स, रेल्वेने, तर काही मतदारांना विमानाने आणण्याची व्यवस्था केली आहे. एकेक मतदार उमेदवाराच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे एकेक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी संपर्क यंत्रणा अधिक गतीमान झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com