अनाथ, निराधारांना ‘सावली’ची ऊब

संतोष कणसे
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

कडेगावसह कऱ्हाड येथे शंभरांवर लोकांना थंडीपासून बचावासाठी सावली प्रतिष्ठानने व ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांर्तगत चादरींचे वाटप करून माणुसकीची ऊब निर्माण केली. ‘एक हात मदतीसाठी’ या उपक्रमाचे कडेगावसह कऱ्हाड परिसरातही कौतुक होत आहे.     

कडेगाव -  थंडी वाढू लागलीय. निवारा नाही. आकाश हेच ज्यांचे छत आहे, असे निराधार, अनाथ, मनोरुग्ण व ऊसतोडणी मजूर सार्वजनिक ठिकाणांचा आधार घेत आहेत. काही ठिकाणी उघड्यावर थंडीत कुडकुडत रात्र काढतात. कडेगावसह कऱ्हाड येथे शंभरांवर लोकांना थंडीपासून बचावासाठी सावली प्रतिष्ठानने व ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांर्तगत चादरींचे वाटप करून माणुसकीची ऊब निर्माण केली. ‘एक हात मदतीसाठी’ या उपक्रमाचे कडेगावसह कऱ्हाड परिसरातही कौतुक होत आहे.     

नोव्हेंबर सुरू झाला. थंडीपासून बचावासाठी स्वेटर, मफलर, कानटोप्या खरेदी करू. पण तुमच्या जुन्या स्वेटरचे काय ? फेकून द्यायचा विचार असेल. तर यावर्षी एक गोष्ट करा...जुने स्वेटर स्वच्छ धुऊन कार किंवा मोटारसायकलच्या डिगीत ठेवा. थंडीत मोटारसायकल व कारमधून ऑफिस, कामानिमित्त बाहेर जात असताना रस्त्यावर चिमुकली मुले, अनाथ व निराधार थंडीत कुडकुडताना दिसले तर स्वेटरसह ऊब देऊन बघा... तुमची थंडी ते हसरे चेहरे पाहून पळेल’’. ‘एक हात मदतीसाठी’ नावाने ‘कडेगाव स्मार्ट सिटी बनवू’ या ग्रुपवर विचार मांडण्यात आला.

सावली प्रतिष्ठानने कडेगाव, कऱ्हाड येथील निराधार, अनाथ, मनोरुग्ण तसेच ऊसतोडणी मजुरांच्या चिमुकल्यांना थंडीपासून बचावासाठी शंभरावर चादरींचे वाटप केले. येथे व कऱ्हाड येथे रेल्वे स्टेशन, कृष्णा नाका, कॉटेज हॉस्पिटल, बसस्थानक, कृष्णा हॉस्पिटल, कोल्हापूर नाका येथे व रस्त्यावर भटकत असलेल्या अनाथ, निराधार, मनोरुग्ण आदी थंडीने कुडकुडलेल्यांना चादरींचे वाटप केले. त्यामुळे अनाथ, निराधार, मनोरुग्णांचे हसरे चेहरे पाहून थंडीतही कार्यकर्त्यांची थंडी अक्षरश: पळाली. पण ‘एक हात मदतीसाठी’ उपक्रमाने मिळालेले समाधान ते शब्दांत मांडू शकत नाहीत.

‘सावली’चे विठ्ठल खाडे, युवराज जरग, अनिल गोरे, संदीप पाटील, असिफ तांबोळी, समीर तांबोळी, ज्ञानेश्‍वर हेगडे, प्रदीप देसाई, राजेंद्र जाधव आदी सहभागी झाले.