नगरसेवक शेखर माने शिवसेनेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

सांगली - महापालिकेतील काँग्रेसच्या उपमहापौर गटाचे नेते, नगरसेवक शेखर माने यांनी धक्कातंत्राचा वापर करीत आज शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला असून, शहरातील सेनेला बळकटी देऊन पालिकेवर भगवा फडकावण्याचा इरादा त्यांनी या वेळी व्यक्त केला. 

प्रवेशावेळी खासदार गजानन कीर्तिकर, उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, संजय विभूते, संघटक दिगंबर जाधव उपस्थित होते. माने काँग्रेसमध्ये दिवंगत मदन पाटील समर्थक म्हणून कार्यरत होते. गेल्या पालिका निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना स्वीकृत म्हणून संधी देण्यात आली. मधल्या काळात मदन पाटील यांची साथ सोडून त्यांनी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याबरोबर हातमिळवणी केली. पालिकेत काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यात उपमहापौर गटाचे नेते म्हणून माने केंद्रस्थानी आले. 

सांगली-सातारा स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत त्यांनी काँग्रेसविरुद्ध बंड केले. त्यांना विशाल यांची फूस असल्याची चर्चा होती. त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले. सध्या ते भारतीय जनता पक्षात जाणार, अशी चर्चा होती. ती अजून ताजी असतानाच माने यांनी हातात शिवबंधन बांधून धक्कातंत्र वापरले. मिरज शहरातून प्रदीप कांबळे यांनीही प्रवेश केला. माने यांनी सेनेत प्रवेश केला असला तरी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या त्यांच्या समर्थकांना पक्षबदल करता येणार नाही. ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर काय निर्णय घेतात, याकडे मात्र लक्ष असेल.  

सवंगडी ‘मातोश्री’बाहेर
शेखर माने यांच्या अलीकडच्या काळातील राजकीय डावातील काही महत्त्वाचे सवंगडी ‘मातोश्री’वर हजर होते. तांत्रिक कारणाने त्यांनी चित्रात येणे टाळले. उद्या (ता. १६) शिवसेनेचे कार्यकर्ते दुपारी तीनला सांगली टोला नाका येथे स्वागत करणार आहेत.