सांगली महापालिका कॉम्प्लेक्ससाठी बळी हवाय का?

सांगली महापालिका कॉम्प्लेक्ससाठी बळी हवाय का?

महापालिकेच्या प्रसूतिगृहातील जीवघेणी हलगर्जी नुकतीच समोर आली. पोटातील गर्भ तीन आठवड्यांपूर्वी मृत झालेला असताना बाळाची वाढ व्यवस्थित आहे, असा अहवाल देऊन त्या गर्भवतीच्या जीवाशी खेळ केला गेला. गर्भपात झाल्यानंतर त्या सुदैवाने वाचल्या. मात्र, परिस्थिती तिचा बळी जावा, अशीच होती. रुग्णालयाच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्‍स बांधून कारभाऱ्यांना कोट्यवधीचा बाजार करायचा आहे. त्यामुळे अशा प्रसंगाचेही गांभीर्य त्यांना कळत नाही. भस्म्या रोगाची लागण झालेले कारभारी आणि रांगेत उभे राहून ‘वाटा’ घेणारे काही विरोधक, या घातक फेऱ्यात अडकलेल्या सांगलीकरांची अवस्था पोटातील त्या मृत गर्भासारखीच झाली आहे. सारेच निपचीत पडले आणि या शहराचा बळी जातोय.

महापालिकेतील दिव्य कारभाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला गेला आहे. भूखंडापासून मुरमापर्यंत आणि ड्रेनेजपासून ते दारूपर्यंत संधी मिळेल तेथे तोंड मारणाऱ्यांनी कुठे भानगड केली नाही, असे शोधून सापडणार नाही. हे कारभारी कमी होते म्हणून की काय त्यांना लाजवेल असा कारभार महापालिकेच्या डॉक्‍टर मंडळींनी सुरू केला आहे. ‘ढवळ्याशेजारी पवळा बांधला...’ अशी इथली गत आहे. प्रकरण खूप गंभीर आहे. एका गर्भवतीने पालिका प्रसूतिगृहात सोनोग्राफी करून घेतली. अर्भक व्यवस्थित वाढत आहे, असा अहवाल दिला गेला. ती बिचारी ‘डॉक्‍टर म्हणजे देव’ मानणारी... दुर्दैवाने तिला त्रास व्हायला लागल्यानंतर खासगी रुग्णालयात तपासणी केली. भयानक सत्य समोर आले. तो गर्भ तीन आठवड्यांपूर्वीच मृत झाला होता. वाचून सुन्न होतं... का खेळ मांडलाय लोकांच्या जीवाशी, याच्या मुळाशी जावं लागतं. इथल्या डॉक्‍टरांना कशाची भीती वाटत नाही का? त्यांच्या नोकरीवर कारभाऱ्यांचा वरदहस्त असेलही. मात्र, माणसांच्या जीवाची तमाच नाही का? इथे येणारे सारे गरीब असतात, त्यांच्याशी कसंही वागलं तरी खपून जातं, हा मस्तवालपणा इथे आलाच कोठून आणि हे असंच सुरू राहिलं तरी चालतं, ही बेफिकीरी कशासाठी? 

या व्यवस्थेतील गॉडफादर लोकांचा डोळा प्रसूतिगृहाच्या जागेवर आहे. भस्म्या रोगाने यांच्या पोटात एवढा खड्डा पडलाय की शहर लुबाडून खाल्ले तरी तो भरता भरेना. जाता-जाता मोठा आंबा पाडायचा आहे. एखादा मोठा प्रकल्प उभा करताना नरबळी दिल्याच्या घटना पूर्वी घडायच्या. महापालिका कारभाऱ्यांना इथे शॉपिंग कॉम्प्लेस बांधताना तेच तर करायचे नसावे? या प्रसूतिगृहात एखाद्याचा जीव गेल्यावर ते बंद करता येईल, असे त्यांना वाटते का? तसे नसते तर या प्रसूतिगृहाची अवस्था एखाद्या कोंडवाड्यासारखी झालीच नसती. इथली व्यवस्था लोकांच्या जीवाशी खेळली नसती. राज्य शासनाकडून इथल्या सुविधांसाठी पुरेसा निधी आला आहे. दुरुस्तीसाठी पैसे आहेत. मात्र, इमारत पाडायचीच, हे ठरले असल्याने दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पुरेसा स्टाफ नाही अन्‌ आहेत त्यांची लोकांशी सौजन्याने वागण्याची तयारी नाही.   
शामरावनगरमध्ये पाण्यासाठी महिलांची भांडणे लागली आणि एका बाईचा जीव गेला. त्यानंतर तेथे पाण्याची नीट व्यवस्था केली गेली. तशीच प्रतीक्षा प्रसूतिगृहात सुरू आहे का? या प्रसंगानंतर एकही विरोधक रस्त्यावर आलेला नाही. कुणाला या कारभारावर हल्लाबोल करावा वाटत नाही. इथल्या नियोजित कॉम्प्लेक्‍समध्ये साऱ्यांनी आपल्या दुकानांचे बुकिंग केले आहे, असा निष्कर्ष काढावा का?

या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर महापालिकेने कारवाई केलीच पाहिजे. कुणालाही संरक्षण देऊ नका; अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून सामान्य महिलांचा प्रश्‍न आपल्या हातात घेईल.
- नीता केळकर, प्रदेश उपाध्यक्षा, भाजप

अपुरे कर्मचारी, रुग्णांबरोबर सौजन्याने न वागणे असे प्रकार सुरू आहेत. सुसज्ज थिएटर आहे, निधी आहे. मात्र, निव्वळ कारभाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जीवघेण्या यातना सोसाव्या लागतात. प्रसूती, शस्त्रक्रिया होत नाही म्हणून रुग्णांना ‘सिव्हिल’ला पाठविणे, रुग्णवाहिकेवर चालक नसणे असे गंभीर प्रकार होताना दिसताहेत. इमारतीवर डोळा ठेवूनच हा प्रकार सुरू आहे. 
- सुनीता पाटील,
नगरसेविका, उपमहापौर गट

जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. आम्ही गेल्या महिन्यात सर्वेक्षण केले. अस्वच्छता, जुनी यंत्रणा, कोसळायला झालेली भिंत आणि ढिसाळ वैद्यकीय व्यवस्था याचे निरीक्षण केले. त्याची तक्रार केली. आयुक्त पुण्यात असल्याने भेट झाली नव्हती. आताची घटना तर कहर आहे. याला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षाच झाली पाहिजे. शासन आणि महापालिका कारभारी याला जबाबदार आहेत.
- विनया पाठक, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com