सांगली-सोलापुरातील गाढवांची चीनकडे तस्करी? 

सांगली-सोलापुरातील गाढवांची चीनकडे तस्करी? 

सांगली - सांगली परिसरातून गेल्या काही वर्षांत गाढवांच्या चोऱ्या वाढल्या आहेत. ट्रकसारख्या वाहनांमध्ये गाढवे कोंबून ती सोलापूरला नेली जातात. या गाढवांची आंध्र प्रदेशमध्ये मटणासाठी तस्करी होत असल्याचे यापूर्वी एकदा सिद्ध झाले आहे. मात्र अलीकडेच आंतराष्ट्रीय स्तरावर गाढवांसाठी काम करणाऱ्या "डॉंकी सॅंच्युअरी' या संघटनेने गाढवांच्या कातडीचा औषधी वापरासाठी जगभरातून चीनमध्ये तस्करी होत असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. 

सांगली परिसरात वीट भट्ट्यांच्या माती वाहतुकीसाठी गाढवांचा पूर्वापार वापर होत आला आहे. मात्र यांत्रिकीकरणामुळे तो कमी झाला आहे. तेच जगभरातील चित्र आहे. त्याचबरोबर जगभरातून गाढवांच्या तस्करीचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत गेल्या जानेवारीत आफ्रिकेत थोपिया येथे झालेल्या परिषदेत यावर प्रसिद्ध झालेला "अंडर द स्कीन' हा अहवाल बरेच काही भाष्य करतो. या अहवालानुसार आफ्रिका, केनिया, इजिप्त आणि भारतातून गाढवांच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी, तसेच स्त्रियांमधील गर्भाशयाच्या आजारांविषयची औषधे बनवण्यासाठी गाढवाच्या कातडीचा वापर होत होतो. त्यासाठी गाढवांची मोठ्या संख्येने तस्करी करुन त्यांची रवानगी कत्तलखान्यांत होत आहे. 

गाढवांची तस्करी करताना सांगोला पोलिसांनी एका टोळीला नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून गाढवे व वाहन जप्त केले आहे. प्राथमिक तपासात ही तस्करी सांगली जिल्ह्यातूनही होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गाढवांची आंध्र प्रदेशच्या दिशेने वाहतूक होत असल्याचे "डॉंकी सॅंच्युअरी'संघटनेच्या प्रतिनिधी सुचेता गायकवाड यांचे म्हणणे आहे. हा तपास मुळापर्यंत गेल्यास आंतरराष्ट्रीय तस्करीचे जाळे उघड होऊ शकते असा दावा त्यांनी केला. त्या म्हणाल्या,""राज्यात यापूर्वी नांदेड, सांगली, जयसिंगपूर, सोलापूर जिल्ह्यात गाढवांच्या तस्करीचे गुन्हे नोंदविले आहेत. मात्र हे गुन्ह्यांचा तपास चोरीच्या तपासापुरताच मर्यादित राहिला आहे. वस्तुतः आंध्र प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये गाढवाचे मटण खाणाऱ्या जमाती आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत देशभरातून तिकडे गाढवांची तस्करी केवळ मटणासाठी होते असे मानणे अंधपणाचे ठरेल. "अंडर द स्कीन' अहवालाने गाढव तस्करीच्या काळ्या बाजूवर प्रकाश टाकला आहे. सांगली-सोलापूरमधून होणारी तस्करीही त्याच उद्देशाने होत असल्याचा संशय आहे. आम्ही पोलिस अधिकाऱ्यांना भेटून तसे सांगितले आहे; मात्र आंध्र प्रदेशपर्यंत तपासासाठी जाण्याबाबत अधिकारी असमर्थतता व्यक्त करतात. आम्ही सांगोला पोलिसांना हा अहवाल देऊन वस्तुस्थिती मांडली आहे.'' 

""वीटभट्ट्यांचा हंगाम संपल्यानंतर गाढवांना बांधून ठेवले जात नाही. त्यामुळे या काळातच गाढवांच्या चोऱ्या होतात. गेल्या दोन वर्षांत किमान चारशे गाढवे चोरीस गेली आहेत. गेल्या वर्षी आम्ही एक टोळी पकडली. त्या टोळीचा माग आंध्र प्रदेशपर्यंत लागला. तिथल्या माणसांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. मात्र त्या वेळी पोलिसांनी आम्हालाच "तुम्ही गप्प बसा आम्हाला करायचा तसा तपास करतो' असे सांगत परत पाठवले. त्यांच्या या वर्तणुकीने आता आम्ही गाढव चोरीची फिर्याद द्यायलाही जाणेही अवघड झालेय.'' 
- कृष्णा चव्हाण (गाढव पालक), राजीव गांधी झोपडपट्टी, जयसिंगपूर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com