भरारीसाठी सुरेशला हवाय मदतीचा ‘खो’

भरारीसाठी सुरेशला हवाय मदतीचा ‘खो’

वाळवा - येथील खो-खो खेळाडू सुरेश शामराव सावंत याची इंग्लंड व भारत यांच्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय खो-खो अजिंक्‍यपद कसोटी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. एक सप्टेंबरपासून ही स्पर्धा चार शहरांत होत आहे. दौऱ्यासाठी ५० हजार खर्च  येणार आहे. दररोज दुसऱ्याच्या बांधावर रोजगाराला जाणाऱ्या धरणग्रस्त कुटुंबातील सुरेशला खर्च करणे आवाक्‍याबाहेर झाले आहे. त्याला मदतीची गरज आहे.

तो राज्यशास्त्रात एम. ए. करतोय. खो-खोच्या  मैदानावरील त्याची एंट्री म्हणजे प्रतिस्पर्ध्यांचे अवसानच गळून जाते. आक्रमण, संरक्षणात त्याची जिगरबाज खेळी पाहताना क्रीडा रसिकांचे भान हरपते. सुरेश खो-खोचा बलाढ्य खेळाडू म्हणून ओळखला जातो. येथे धरणग्रस्तांच्या वसाहतीत तो राहतो. त्याचे भाऊ नरेश, लक्ष्मण, रामचंद्र, बहीण गौरी हेदेखील खो-खोतील  राष्ट्रीय खेळाडू. तपाहून जास्त काळ सुरेशने देशभर विविध मैदाने गाजवली. राष्ट्रीय संघाचे दोनदा नेतृत्व केले. सुरेशने सातवेळा राष्ट्रीय खो-खो स्पर्धा गाजवली. 

सुरेशचा भाऊ नरेशला यंदा शिवछत्रपती पुरस्कार  मिळाला. दररोज एका बांधावर मोलमजुरी करत सुरेशचे आई-वडील भाऊ-बहीण खो-खोत नाव मिळवण्यासाठी घाम गाळत आहेत. पाच भावडांना मिळालेल्या पुरस्कार  व चषकांची घरात गर्दी आहे. ती ठेवायलाही जागा नाही. आर्थिक विवंचना दूर करताना मात्र कुटुंब पार वाकलंय. त्यांचा अखंड संघर्ष सुरू आहे. 

सुरेश हलाखीत जगतोय. गरिबीच्या खाईतून वर यायची त्यांची धडपड आहे. त्याच्यासमोर आलेल्या खेळाडूला सुरेश आपल्याला टिपून कधी शिकार करतो याची धास्ती असते. मैदानावर त्याची नजर प्रतिस्पर्धी खेळाडू टिपण्यासाठी भिरभरत असते. मैदानातील त्याचा वावर प्रतिस्पर्धी संघ सुरेशच्या पहिल्या एंट्रीपासून दडपणाखाली असतो. 

चांदोली धरण परिसरात दऱ्याखोऱ्यात वाढलेली सुरेशसह भावंडे नैसर्गिक चपळाईचा वरदहस्त लाभलेला आहेत. त्यांचे लढण करो या मरो असंच असतंय. सप्टेंबरमध्ये इंग्लंड-भारत अशी आंतरराष्ट्रीय खो-खो कसोटी आहे. यापूर्वी प्रथम इंग्लंड व नेपाळमध्ये ही  स्पर्धा झाली. यंदा तिसरी कसोटी मालिका आहे. त्या अंतर्गत चार शहरांत पाच-सहा सामने होणार आहेत. तीनही स्पर्धेत निवड होऊन सुरेशने हॅटट्रीक साधली आहे.

भारतीय संघात निवडला गेलाय. पण दौऱ्यासाठी दीड लाख खर्च येणार आहे. राज्य खो-खो असोसिएशन ६० हजारांचा खर्चाची जबाबदारी उचलणार आहे. उर्वरित रक्कम कशी उभी करायची हे सुरेशसमोर संकट आहे. त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी खो-खो व क्रीडा क्षेत्रावर प्रेम करणाऱ्यांनी मदत करावी, अशी अपेक्षा आहे. केवळ आर्थिक कारणाने एक गरीब खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकण्यापासून वंचित राहू नये, अशी लोकभावना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com