सांगली पोलिस डिपार्टमेंट शुगरग्रस्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

वाढता वाढता वाढे - दक्षतेची गरज ; आरोग्य तपासणी शिबिरातील माहिती

सांगली - बदलणाऱ्या ड्युटी... वेळेवर जेवण नसणे...कामाचा ताण... त्यातून काहींना दारूचे व्यसन... त्यातून अनेकांची ‘शुगर’ वाढल्याचे स्पष्ट झाले. सांगलीत झालेल्या पोलिसांच्या वैद्यकीय तपासणीत अनेकांची रक्तातील साखर अर्थात ‘शुगर’ वाढल्याचा अहवाल आला. १८० पासून काही पोलिसांची शुगर ५०० पर्यंत गेली आहे. ‘शुगर’ वाढल्याचे प्रमाण म्हणजे संबंधितांसाठी धोक्‍याची घंटाच आहे.

वाढता वाढता वाढे - दक्षतेची गरज ; आरोग्य तपासणी शिबिरातील माहिती

सांगली - बदलणाऱ्या ड्युटी... वेळेवर जेवण नसणे...कामाचा ताण... त्यातून काहींना दारूचे व्यसन... त्यातून अनेकांची ‘शुगर’ वाढल्याचे स्पष्ट झाले. सांगलीत झालेल्या पोलिसांच्या वैद्यकीय तपासणीत अनेकांची रक्तातील साखर अर्थात ‘शुगर’ वाढल्याचा अहवाल आला. १८० पासून काही पोलिसांची शुगर ५०० पर्यंत गेली आहे. ‘शुगर’ वाढल्याचे प्रमाण म्हणजे संबंधितांसाठी धोक्‍याची घंटाच आहे.

‘ऑन ड्युटी २४ तास’ अशी पोलिस दलाची व्याख्या आहे. सध्या पोलिस दलात काम करताना अनेकांना ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. सतत बदलणाऱ्या ड्युटीमुळे तब्येतीकडे लक्ष देण्यास वेळच नसतो. वेळेवर जेवण मिळत नाही. सततचा बंदोबस्त, कामाचा ताण आणि दैनंदिन घडामोडी यामुुळे अपवाद वगळता अनेक पोलिसांची जीवनशैली व्यस्त बनलीय. आजारी पडल्यानंतरही अनेकांना उपचार घेण्यास वेळ नसतो. दुखणी अंगावरच काढायची वेळ येते.

आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्यामुळे दोन-चार वर्षापासून पोलिस ठाण्यातच शिबिरे आयोजित केली जातात. त्यानिमित्ताने तरी पोलिस आरोग्य तपासणी करतील हा त्यामागचा हेतू. पाच महिन्यापूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात मुंबईतील एका संस्थेमार्फत पोलिसांची तपासणी झाली. त्यात अलीकडच्या काळात पोलिसांची ‘शुगर’ वाढल्याचे दिसून आले. रक्तातील साखरेचे प्रमाण उपाशीपोटी १२५ पेक्षा कमी आणि जेवणानंतर दोन तासांनी २०० च्या खाली असले पाहिजे, असे सांगितले जाते. सांगली ग्रामीण पोलिस ठाणे येथे नुकतेच आरोग्य तपासणी शिबिर झाले. तेव्हा अनेक पोलिसांची शुगर वाढल्याचा अहवाल मिळाला. २०० पासून काहींनी ५०० चा आकडा गाठल्याचे दिसले. संबंधितांना डॉक्‍टरांनी औषधोपचार सांगून पुढील उपचारास बोलावले आहे. पोलिसांची वाढलेली शुगर म्हणजे पुढील गंभीर आजारांना निमंत्रण आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठपुरावा
खाकी प्रेस ॲंड मिडिया सांगलीचे प्रशांत पाटील यांनी पोलिसांचा ताण-तणाव कमी करण्यासाठी आणि इतर मागण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. त्याबद्दल गृहमंत्रालयाने राज्य पोलिस दलाला याबाबत सूचना केल्या. त्याच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे.

‘रिफ्रेशर कोर्स’मध्ये ताण नको
पोलिस दलातर्फे प्रत्येक महिन्यात १५-१५ दिवसाचे दोन ‘रिफ्रेशर कोर्स’ मुख्यालयात आयोजित केले जातात. पोलिसांची दैनंदिन ताणातून मुक्तता व्हावी यासाठी हा कोर्स असतो. परंतु बऱ्याचदा कोर्समध्ये आल्यानंतर इतर कामांना पोलिसांना जुंपले जाते. बंदोबस्त किंवा अन्य कामे करावी लागतात. त्यामुळे रिफ्रेशर कोर्समध्ये ताणतणाव मुक्तीवर भर दिला जावा, अशी मागणी असते.

शिबिरांची आवश्‍यकता
सेवासदन लाईफ लाईन सुपर हॉस्पिटल मिरज व पोलिसांच्या वतीने ग्रामीण पोलिस ठाण्यात नुकतेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. शिबिरात हृदयरोग तपासणी, रक्तातील साखर, मोतीबिंदू, ई.सी.जी. इत्यादी तपासण्या केल्या. तेव्हा अनेक पोलिसांना शुगरचा त्रास असल्याचे दिसून आले. अशा प्रकारची शिबिरे पोलिस ठाणेस्तरावर आयोजित करण्याची आवश्‍यकता आहे.