मिरजेत नाही ‘सुपरस्पेशालिटी’

मिरजेत नाही ‘सुपरस्पेशालिटी’

मिरज - अत्यंत गुणवत्तापूर्ण उपचारांसाठी महाराष्ट्रभर नाणावलेल्या आरोग्यपंढरीचा वैद्यकीय विस्तार मंदावल्याची स्थिती आहे. वैद्यकीय सेवेच्या ११० वर्षांनंतरही शहरात वॉन्लेस, भारती आणि शासकीय रुग्णालय या तीनच दवाखान्यांत एकापेक्षा अधिक आजारांवर उपचार होतात. चारशेवर दवाखाने आणि हजारभर डॉक्‍टर्स असतानाही एकही मल्टीस्पेशालिटी किंवा सुपरस्पेशालिटी इस्पितळ उभे राहू शकले नाही. 

विविध आजारांचे गाठोडे घेऊन शहरात येणाऱ्या  रुग्णाला उपचारांसाठी ठिकठिकाणी फिरवले जाते. वेळप्रसंगी अन्य एक्‍स्पर्ट डॉक्‍टरांना बोलावून घेतले जाते. प्रत्येक डॉक्‍टर व्यवसायवाढीसाठी धडपडतो आहे.

दवाखान्याच्या मार्केटिंगसाठी डॉक्‍टरांचे प्रतिनिधी आज कर्नाटकसह सोलापूर, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आदी जिल्ह्यांत जातात. काहींच्या कर्नाटकातील कागवाड, चिक्कोडी, अथणी आदी भागांत रुग्णवाहिका आहेत; तेथील रुग्ण मिरजेत आणण्याची स्पर्धा सुरू आहे. याउलट इचलकरंजीत निरामय किंवा कोल्हापुरात आधारसारखी इस्पितळे सुरू झाली. मेंदुविकार, हृदयरोग, नेत्रविकार, कर्करोग, मधुमेह, जनरल फिजिशियन, अस्थिरुग्ण आदी आजारांचे एक्‍सपर्ट शहरात आहेत; त्यांनी एकछत्री सेवा सुरू करण्याची गरज आहे.

स्वत:पुरता परीघ
मिरजेत दवाखान्यांचे विस्तीर्ण इमले उभे राहात आहेत. कर्करोगावर उपचार करणारे पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन सिद्धिविनायकच्या निमित्ताने सुरू आहे. नॅब इस्पितळाच्या निमित्ताने नेत्रोपचाराचे खास केंद्र काम करते आहे. मेंदुविकारांवरील उपचारांसाठी वॉन्लेसचा दबदबा वाढला आहे. कुष्ठरोग्यांसाठी रिचर्डसन लेप्रसी, मानसिक उपचारांसाठी कृपामयी इस्पितळ यांचा लौकिक अजूनही आहे.

कार्पोरेट शहरांसारखी मॉल संस्कृती मिरजेत नाही. दवाखाने आणि डॉक्‍टरांसाठी आवश्‍यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा अभाव आहे. अत्यंत माफक शुल्क घेऊन किंबहुना काहीवेळा तोटा सोसून उपचार करावे लागतात. तज्ज्ञ डॉक्‍टरांची सेवा आणि महागडे उपचार घेण्याची रुग्णांचीही क्षमता नाही. डॉक्‍टर चोवीस तास उपलब्ध असलेच पाहिजेत, अशी रुग्णांची मागणी असते. या स्थितीत एक्‍स्पर्ट डॉक्‍टर मिरजेत सेवा देऊ शकत नाहीत. दवाखान्यांत महागडी गुंतवणूक करता येत नाही. याचा परिणाम मिरजेच्या वैद्यकीय विस्तारावर झाला  आहे. 
- डॉ नथानियल ससे,
संचालक, वॉन्लेस इस्पितळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com