वर्दीतील क्रौर्य...जंगलातील लाकडे घेऊन मृतदेह जाळला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

सांगली / कोल्हापूर / आंबोली - लूटमार प्रकरणातील संशयित अनिकेत कोथळे याचा मृतदेह जंगलातील लाकडे घेऊन पेटवून दिल्याचे  तपासात पुढे आले. दरीच्या उतारावर संशयित पोलिसांनी हे कृत्य केले. अर्धवट जळालेला मृतदेह सांगली पोलिसांनी ताब्यात घेऊन मिरज येथे विच्छेदनासाठी पाठविला. 

सांगली / कोल्हापूर / आंबोली - लूटमार प्रकरणातील संशयित अनिकेत कोथळे याचा मृतदेह जंगलातील लाकडे घेऊन पेटवून दिल्याचे  तपासात पुढे आले. दरीच्या उतारावर संशयित पोलिसांनी हे कृत्य केले. अर्धवट जळालेला मृतदेह सांगली पोलिसांनी ताब्यात घेऊन मिरज येथे विच्छेदनासाठी पाठविला. 

दरम्यान लूटमार प्रकरणातील संशयिताचा कोठडीतील मृत्यू आणि त्याचा मृतदेह जाळल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक युवराज कामटेसह तीन पोलिस व एका झिरो पोलिसाला न्यायालयाने १३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील आणखी एक संशयित पोलिस अनिल लाड याला आज पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले नाही.
लूटमार प्रकरणी संशयित म्हणून पकडलेल्या तरुणाला पोलिसांनी थर्ड डिग्री वापरली. त्यात त्याचा पोलिस ठाण्यातच मृत्यू झाला. प्रकरण अंगलट येते आहे समजून त्याचा मृतदेह अंबोलीजवळ जाळण्यात आला. या प्रकरणाने गेले दोन दिवस जिल्हा ढवळून निघाला आहे. 

एरवी गुन्हेगारांना न्यायालयात आणणारे या पोलिसानांच आज जमावापासून तोंड लपवत न्यायालयात हजर व्हावे लागले. उपनिरीक्षक कामटे, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, सूरज मुल्ला, पोलिस वाहन चालक राहुल शिंगटे, झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांना आज बुरखे घालून पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. या वेळी राजवाडा चौकात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. बंदोबस्तालाही पोलिस आणि संशयितही पोलिस असे आजचे दृश्‍य कायदा सुव्यवस्थेचा धिंडवडे काढणारे होते.

मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. खापे यांनी सर्व संशयितांना १३ दिवस पोलिस कोठडी सुनावली. कोल्हापूर रस्त्यावर सांगली आकाशवाणीजवळ एका अभियंत्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून दोन हजार रुपये आणि मोबाईलची लूट केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी संशयित म्हणून अनिकेत कोथळे (वय २३) आणि अमोल भंडारे (२६, दोघे भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) यांना दोन दिवसांपूर्वी अटक केली. दोघांना सोमवारी (ता. ६) रात्री चौकशीसाठी बाहेर काढल्यावर दोघेही पळाले, असा पोलिसांनी प्रथम बनाव रचला. अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांना अनिकेतच्या घातपाताची शंका आल्याने प्रकरण तापले. मंगळवारी शहरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यात भर पडली. त्याच दिवशी रात्री या गंभीर घटनेचा पर्दाफाश झाला.

कोठडी मिळाल्यानंतर सर्व संशयितांना विश्रामबागला पोलिस मुख्यालयात हलवण्यात आले. आणखी एक संशयित पोलिस अनिल लाड याला मात्र आज पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले नाही. मृतदेह जाळलेले ठिकाण, वापरलेली गाडी, संपूर्ण घटनाक्रम याबद्दल त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे समजले. आज त्याला आंबोलीत घाटान नेण्यात आले होते. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, वापरलेली गाडी, घटनास्थळ आदींचे तपशील जमा करण्याची पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. 

पोलिसांची ‘बेकर’ गाडी गुन्ह्यात प्रथमच जप्त
पोलिस ठाण्यातील कामकाजासाठी असलेल्या ‘बेकर’ गाडीचा दैनंदिन कामासाठी उपयोग केला जातो. काही ठिकाणी ‘बेकर’ने अपघात केल्यानंतर ती गाडी तपासात जप्त करण्याचे प्रकार घडले; परंतु उपनिरीक्षक कामटेने चक्क या साऱ्या प्रकरणात ‘बेकर’चा वापर केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे ‘सीआयडी’ने ‘बेकर’ गाडी जप्त केली. पोलिसांनी गुन्ह्यासाठी बेकर वापरण्याचा आणि दुसऱ्या पोलिसांनी ती तपासकामी जप्त करण्याचा पहिलाच प्रकार म्हणावा लागेल. ‘बेकर’सह गुन्ह्यामध्ये अनिल लाड याची ‘सेलेरिओ’ मोटार, पोलिस नसरूद्दीन मुल्लाची दुचाकी, उपनिरीक्षक कामटेची बुलेट वापरली गेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या गाड्या जप्त केल्या आहेत.

निलंबनाचा आदेश जारी 
पोलिस कोठडीतील संशयित अनिकेत कोथळे याला चौकशीदरम्यान थर्ड डिग्री वापरून जीवानिशी मारल्याप्रकरणी पीएसआय युवराज कामटे, अरुण टोणे, अनिल लाड, नसरुद्दीन मुल्ला या चौघांना निलबित केल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी काढले.

आंबोलीतील मृतदेह मिरज येथे पाठविला
आंबोली - सांगली येथील पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेचा मृतदेह सावंतवाडी न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. बुधवंत व पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथे पाठविण्यात आला.

आंबोली-महादेवगड येथे पोलिस कोठडीतील आरोपी कोथळेला जाळले होते. महादेवगड पाँईंट येथे गाडी पार्किंग करून डाव्या बाजूला जंगलात जाऊन दरीच्या उतारावर लाकडे गोळा करून पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्यात आला. संबंधित मृतदेह अर्धवट जाळला होता. शेजारी अर्धवट जळालेली लाकडे होती. चेहरा व पाय पोटाकडची कातडी नसलेली होती. आज सावंतवाडी न्यायाधीश बुधवंत, सांगलीचे पोलिस अधीक्षक तपासी अधिकारी धीरज पाटील, सांगलीच्या पोलिसांची टीम तसेच फॉरेन्सिक लॅबचे टेक्‍निशियन, नायब तहसीलदार शिवराम जाधव तसेच पोलिस निरीक्षक सुनील धनावडे आदी उपस्थित होते. या वेळी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज येथे नेण्यात येणार आहे. नातेवाईकांकडे अस्थि देण्यासाठी कलशात ठेवण्यात आल्या. या वेळी सांगलीचे डॉक्‍टर प्रा. शिंदे तसेच सीआयडी उपनिरीक्षक योगेश यादव व पोलिस उपस्थित होते. घटनास्थळी पत्रकार व अन्य व्यक्तींना जाण्यास प्रतिबंध करण्यात आला. येथे स्पॉट दाखविण्यासाठी या प्रकरणातील आरोपी पोलिस हवालदार याला आणण्यात आले होते.

कामटेने नाव बदलल्याची चर्चा
सांगली जिल्ह्यात डॅशिंग एसपी म्हणून कारकीर्द गाजवलेले शहीद अशोक कामटे गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून परिचित होते. मुंबईत दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झाले. सध्या थर्ड डिग्री वापरून संशयिताचा खून केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत गेलेला उपनिरीक्षक युवराजचे आडनाव वेगळेच आहे. त्याने गॅझेटमध्ये ‘कामटे’ नाव बदलून घेतले आहे. त्याप्रमाणे सध्या तो कामटे नाव लावून दबंगगिरी करायचा.

दुकानदाराकडून अनिकेतच्या खुनाची कामटेला सुपारी

सांगली - अनिकेत हरभट रोडवरील एका दुकानात कामाला होता. तेथे अवैध धंदे चालत असल्याची माहिती अनिकेतला होती. त्याचे बिंग फुटण्याच्या भीतीनेच दुकानाचा मालक आणि पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे यांनी साटेलोटे करून अनिकेतचा कायमचा काटा काढल्याचा आरोप कोथळे कुटुंबीयांनी आज पत्रकार परिषदेत केला. अनिकेतचे वडील अशोक, आई अलका, पत्नी संध्या, भाऊ अमित आणि आशीष यांच्यासह या प्रकरणातील दुसरा संशयित अमोल भंडारे याचे चुलते दीपक भंडारे, नगरसेवक युवराज बावडेकर, मंगेश चव्हाण यावेळी उपस्थित होते. 

कुटुंबीयांनी मांडलेली भूमिका अशी - अनिकेत महिन्याभरापूर्वी एका दुकानात कामाला लागला होता. या कालावधीत त्याला या दुकानाच्या वरच्या मजल्यावर चालणाऱ्या अवैध धंद्याविषयी माहिती झाली होती. तेथे उपनिरीक्षक कामटेचाही राबता होता. त्याची वाच्यता करू नये, यासाठी दुकानदार व कामटे यांनी वारंवार पैशांचे आमिषही अनिकेतला दाखवले होते. दरम्यानच्या काळात पगारावरून अनिकेतचे भांडण झाले. सर्व पगार द्यावा, यासाठी अनिकेतने दुकानदारावर दबाव आणला. त्यातून अनिकेतला धडा शिकवण्याची सुपारीच दुकानदाराने कामटे याला दिली. त्यासाठी अनिकेतवर चोरीचा बनाव रचण्यात आला असावा. यापूर्वी कधीही कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभाग किंवा गुन्हा नोंद नसतानाही थेट त्याच्यावर वाटमारीचा गुन्हा दाखल झाला.

अनिकेतच्या आई अलका म्हणाल्या, ‘‘पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांनीही आमची सातत्याने दिशाभूल केली आहे. आमचा अनिकेत परत येईल, असे त्या सांगत होत्या. स्पष्टपणे त्या काहीच सांगत नव्हत्या. त्या रात्री पोलिस ठाण्यामध्ये गेल्यानंतर ‘सीसीटीव्ही’ची तपासणीचीही तसदी त्यांनी घेतली नाही. त्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पदच आहे. त्यांचीही या प्रकरणात चौकशी व्हावी. गुन्ह्यातील संशयितांना कडक शासन व्हावे. त्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी. अनिकेतच्या पत्नीला शासकीय सेवेत घ्यावे.’’

वाटमारीचा बनाव?
अनिकेत आणि अमोलवर दाखल गुन्ह्याची फिर्याद आज पत्रकारांसमोर कुटुंबीयांनी सादर केली. त्यात दोघांनी वाटमारी झालेले अभियंता संतोष गायकवाड मूळचे कवलापूरचे असले तरी सध्या ते मुंबईत वास्तव्याला आहेत, असे म्हटले आहे. त्याचवेळी ही फिर्याद या दोघांच्या नावानिशी नोंद आहे. मुंबईत वास्तव्यास असलेल्या व्यक्तीला थेट संशयितांची नावे समजलीच कशी, सवाल कुटुंबीयांनी केला. संबंधित फिर्यादीने आमच्या मुलांची नावे कशी ओळखली, हेच मुळात संशयास्पद आहे. संबंधित अभियंत्यास हजर करा, अशी मागणी त्यांनी केली.

भंडारेला संरक्षण द्या
या गुन्ह्यातील मुख्य साक्षीदार अमोल भंडारे आहे. पोलिसांनी प्रारंभापासून त्याच्यावर दबाव टाकला आहे. त्याची मुस्कटदाबी यापुढेही होऊ शकते. त्याच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे त्याला पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी त्याचे चुलते दीपक भंडारे यांनी यावेळी केली. 

ठाण्यातच दहन करणार
अनिकेतच्या मृतदेहाची कुटुंबीयांना दिवसभर प्रतीक्षा होती. मात्र दिवसभर तो मृतदेह मिळाला नाही. पत्रकार परिषदेत कुटुंबीयांनी मृतदेह कधीही ताब्यात मिळू द्या. त्याचा मृत्यू पोलिस ठाण्यात झाला असेल तर त्याचे दहनही तेथेच करणार. पोलिसांच्या क्रौर्याचा निषेध आम्ही असाच नोंदवू, असे अनिकेतच्या वडिलांनी संतप्तपणे सांगितले.

‘त्या’ पोलिसांची बडतर्फी होणार - विश्‍वास नांगरे-पाटील

सांगलीतील संशयित आरोपीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला निलंबित फौजदार युवराज कामटेसह पाच जणांना खात्यातून बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग केला असून त्यामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का हे शोधण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची खातेनिहाय चौकशीही सुरू केली आहे. दोषींची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. 

नांगरे-पाटील म्हणाले, ‘‘सांगलीतील एका अभियंत्यास चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी सांगली पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली. संशयित अनिकेत कोथळे (वय २३), अमोल भंडारे (वय २६) या दोघांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. चौकशीवेळी थर्ड डिग्री वापरल्याने अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीतच मृत्यू झाला. चौकशीसाठी बाहेर काढल्यानंतर ते दोघे पळून गेल्याचा बनाव पोलिसांनी प्रथम रचला. कुटुंबीयांनी याबाबत शंका व्यक्त केली. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी केली असता कोथळेचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आंबोलीत नेऊन जाळण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच त्याच्या साथीदारास त्याची वाच्यता करू नकोस म्हणून पोलिसांनी धमकावल्याचा प्रकार पुढे आला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. सीआयडीचे अपर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड, उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या पथकाने सर्व प्रकाराची माहिती घेतली आहे.’’ 

ते म्हणाले, ‘‘सांगलीतील त्या सहा पोलिसांचे कृत्य पोलिस दलाला काळिमा फासणारे आहे. त्यांना तत्काळ निलंबित केले आहे. उपनिरीक्षक कामटेची बडतर्फी हे विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या तर पोलिस कर्मचाऱ्यांची बडतर्फी पोलिस अधीक्षकांच्या अखत्यारित येते. त्या अधिकारानुसार बडतर्फीची कारवाई सुरू केली आहे. ती लवकरच पूर्ण होईल. कोथळेच्या मृतदेह ८० टक्के भाजला असून २० टक्के भाग शिल्लक आहे. त्याच्या डीएनए तपासणीसाठी फौरेन्सिक लॅबचे पथक आंबोलीला पाठविले आहे. तेथील पंचनामा प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, सिंधूदुर्ग व सीआयडी पोलिस उपाधीक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यानंतर पंचनामा सिंधूदुर्ग येथे करण्यात येईल.’’

ते म्हणाले, ‘‘सोमवारी रात्री ९ वाजून १० मिनिटांच्या सुमारास कोथळेचा मृतदेह पोलिस ठाण्याबाहेर नेला. याची माहिती काहींना होती, काहींनी ही घटना पाहिली, काहींनी बघ्याची भूमिका घेतली. तर काहींनी तेथून पळ काढला. याची माहिती जबाबदार घटक म्हणून त्यांनी वरिष्ठांना देणे क्रमप्राप्त होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करण्यास सुरवात झाली आहे. पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांनी पोलिस ठाण्याला सोमवारी सायंकाळी भेट दिली. त्यावेळी तेथील गार्डने त्यांना अटक केलेल्या संशयिताबाबत सात जण असल्याचे सांगितले; मात्र प्रत्यक्षात तेथे कोथळे व भंडारे दिसून आले नाहीत. याबाबत कामटेकडे चौकशी केल्यानंतर त्याने त्या दोघांनी पलायन केल्याचे उत्तर काळे यांना दिले. त्यामुळे त्यांचा संशय बळावला. सखोल चौकशीत हा धक्कादायक प्रकार पुढे आला. या प्रकरणाच्या मुळापर्यंत तपास करून प्रत्येक दोषीवर कारवाई केली जाणार आहे.’’ या वेळी पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, शहर पोलिस उपाधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस उपाधीक्षक आर. आर. पाटील आदी उपस्थित होते. 

कलम ३११ नुसार बडतर्फी
भारतीय राज्य घटनेच्या कलम ३११ नुसार चौकशी प्रक्रिया न करता बडतर्फ करण्याचे अधिकार प्राप्त होतात. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहा जणांवर बडतर्फीची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले. 

कॉल डिटेल्स तपासणार
अनिकेत कोथळे हा पूर्वी जेथे काम करत होता. त्या मालकाकडून त्याला त्रास दिला जात होता का? यासाठी कोथळेचे कॉल डिटेल्स्‌ तपासण्याचे कामही पोलिसांनी सुरू केले आहे. त्याचबरोबर अटक केलेल्या पोलिसांचे कॉल डिटेल्स्‌ तपासण्यात येत असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी सांगितले. 

 

Web Title: Sangli News suspected death in police custody