कोथळे खून प्रकरणी संशयितांचे सहकार्य नाहीच

कोथळे खून प्रकरणी संशयितांचे सहकार्य नाहीच

सांगली -  अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीत अमानुष मारहाण करून बळी घेणाऱ्या संशयित आरोपींची पोलिस कोठडी आज (ता. २३) संपणार आहे. मात्र १५ दिवसांची कोठडी मिळूनही त्यांनी सीआयडीला तपासात सहकार्य केले नाही. अखेरपर्यंत या घटनेबाबत विचारले असता आम्हाला काही माहिती नाही, आम्ही काही केले नाही इतकेच ते सांगत होते, अशी माहिती सीआयडीचे अपर अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी दिली.

कोथळेच्या मृत्यू प्रकरणी अटक केलेल्या बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटेसह अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला आणि झाकीर पट्टेवाले यांची पोलिस कोठडी उद्या समाप्त होत आहे. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी होईल. त्यांच्याकडून गाडी, कामटेचा मोबाईल, कृष्णा घाटावर अमोल भंडारे याला घेऊन थांबलेले दोघे अनोळखी शोधणे आदींसाठी त्यांची दोन दिवस कोठडी वाढवून दिली होती. मात्र यातील काही माहिती सीआयडीच्या हाती लागलेली नाही. १५ दिवसांपेक्षा जास्त पोलिस कोठडी मिळत नसल्याने आता त्यांना न्यायालयाच्या स्वाधीन करावे लागणार आहे.

भक्‍कम पुरावे हातात
सीआयडीचे अप्पर अधीक्षक नरेंद्र गायकवाड म्हणाले, ‘‘संशयित आरोपींनी प्रत्यक्ष घटनेबाबत काही माहिती दिलेली नाही. त्यांनी शेवटपर्यंत तपासात सहकार्य केले नाही. पण त्यामुळे काही फरक पडत नाही. आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत. हे सर्व न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर मिळालेल्या पुराव्यांवरून घटनेचे आरोपपत्र तयार करू. सीसीटीव्ही फुटेजचे डीव्हीआर अद्याप मिळालेले नाहीत. तसेच मोबाईल्सचे कॉल डिटेल्स  काढून तपास करायचा आहे. संशयितांनी घटनेनंतर कोणाशी संपर्क केला, कोणाकडून सहकार्य घेतले याची माहिती मिळवायची आहे.’’

सहआरोपी कुणी नाही
या प्रकरणी अनेकांचे जबाब झाले आहेत. मात्र यातील कोण सहआरोपी आणि कोण साक्षीदार हे त्यांच्या घटनेतील सहभाग आणि भूमिकेवरून ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या जबाबावरून त्यांची भूमिका काय होती  ते स्पष्ट झाल्यावर साक्षीदार, सहआरोपी कोण हे ठरेल, असे श्री. गायकवाड म्हणाले.
डॉक्‍टर, असिस्टंची चौकशी संशयितांनी अनिकेतचा मृतदेह पोलिसांच्या बेकर मोबाईल व्हॅनमधून विश्रामबागला एका खासगी रुग्णालयात नेला होता. मात्र तेथे गर्दी होती. त्यामुळे डॉक्‍टरांनी तो पाहिला नाही.  तसेच असिस्टंनेही तपासले नाही. थोडावेळ वाट पाहून संशयित तेथून निघून गेले होते. या दोघांची आज सीआयडीने चौकशी केली. तेथील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. त्याची तपासणी होणार आहे.

डीएनए अहवाल अजून नाही
अनिकेतच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यासाठी नमुने पाठविले आहेत. मात्र त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. याबाबत काही शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र त्या अफवा असल्याचे श्री. गायकवाड म्हणाले.

लकी बॅग्जचा मालक संशयाच्या भोवऱ्यात
अनिकेतच्या कुटुंबीयांनी शंका व्यक्त केलेल्या लकी बॅग्जचा मालक नीलेश खत्री याची चौकशी सुरू आहे. त्याला आजही (ता.२३) बोलवले आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिली. त्याचा या घटनेशी पूर्ण संबंध  नाही असे अजून म्हणता येत नाही. त्याची चौकशी सुरू आहे, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com