तासगावमध्ये राजकिय वादातून राडा; दगडफेकीत पोलिस अधिकारी गंभीर जखमी

विजय पाटील
मंगळवार, 3 एप्रिल 2018

तासगाव - पोटनिवडणुकीच्या वादातून तासगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार राडा झाला आहे. यावेळी जमावाकडून झालेल्या दगडफेकीमध्ये पोलीस अधिकाऱ्यासह तीन पोलीस जखमी झाले आहेत. ​

तासगाव - पोटनिवडणुकीच्या वादातून तासगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी जमावाकडून झालेल्या दगडफेकीमध्ये पोलीस अधिकाऱ्यासह तीन पोलीस जखमी झाले. सोमवारी रात्री उशीरा हा सर्व प्रकार घडला आहे. 

राजकीय वादातुन झालेल्या मारामारीनंतर एका दुकानावर जमावाने हल्ला केला. या प्रकरणी  भाजपाच्या चार नगरसेवकांसह ७० जणावर खुनाच्या प्रयत्नासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर नगरसेवक बाबासाहेब पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. या राड्यामुळे तासगावमध्ये मोठा तणाव निर्माण झाला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

तासगाव नगरपालिकेच्या वार्ड क्रमांक सहाची पोट निवडणूक पार पाडत आहे. या निवडणुक प्रचाराच्या वादातून तासगावमध्ये भाजप खासदार संजय पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर. आर. पाटील गटात जोरदार हाणामारी झाली. दगडफेकीचेही प्रकार मोठ्या प्रमाणात घडले. सोमवारी रात्री उशीरा हा सर्व प्रकार घडला आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या घरावर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार दगडफेक केली. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या नगरसेवकास मारहाण केली. यामुळे तासगाव शहरात रात्री मोठा जमाव एकमेकांसमोर आला होता. तासगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दगडफेक करणाऱ्या जमावास पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. पण दोन्ही गटाकडून यावेळी जोरदार दगडफेक झाली. यात एक पोलीस अधिकारी व दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोक्यास मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर राड्यानंतर तासगाव शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून सांगली पोलीसांनी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे . 

Web Title: Sangli News Tasgaon Election issue