सुटीतही झाडे जगवण्याची शिक्षकाची धडपड

सुटीतही झाडे जगवण्याची शिक्षकाची धडपड

सांगली - दुष्काळी जत तालुक्‍यातील पूर्व भागात प्यायलाच पाणी मिळत नाही, तर झाडांना, पिकांना द्यायचे कोठून असा प्रश्‍न आहे. मात्र पांडोझरी येथील बाबरवस्ती शाळेतील उपक्रमशील आणि धडपडे शिक्षक दिलीप वाघमारे यांनी उन्हाळी सुटीत झाडांना जगविण्याची जिद्द बाळगली आहे. दीड-पावणेदोन महिन्यांच्या सुटीत अवघा आठवडाभर गावाकडे जाऊन आल्यानंतर इतर दिवसांत झाडे जगविण्यासाठी धडपड करतात. त्यांच्या जिद्दीला चिमुकली मुले, पालक आणि ग्रामस्थांनी साथ दिली आहे.

वाघमारे गुरुजींचे मूळ गाव दूरवरच्या नांदेड जिल्ह्यातील बोळेगाव येथे आहे. आठ-नऊ वर्षांपासून ते सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. दुष्काळी तालुक्‍यातील पांडोझरीतील पहिली ते चौथीपर्यंतच्या बाबरवस्ती शाळेत अध्यापनाचे काम करतात. शाळेला जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. सलग तीन वर्षे झाडांना जगविण्यासाठी वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना घेऊन धडपड सुरू केली आहे.

दीड ते पावणेदोन महिन्यांच्या सुटीत ते केवळ आठ दिवस गावाकडे जाऊन पुन्हा शाळेकडे परततात. त्यानंतर भर उन्हात चिमुकले विद्यार्थी, पालक आणि इतरांना घेऊन झाडे वाचविण्याचा प्रयत्न करतात. परिसरात पाण्याची विक्री टॅंकरमधून केली जाते. अशा परिस्थितीत वाघमारेंची तळमळ पाहून टॅंकर चालक दुंडाप्पा कलादगी यांनी झाडांसाठी टॅंकर मोफत दिला आहे. परिसरातील शेतकरी मायाप्पा गडदे यांनीही महिन्यातून एक वेळा पाईपलाईनमधून चरीत पाणी सोडून मदतीचा हात दिला आहे. वाघमारे यांनी वृक्षसंवर्धनाबरोबर शाळेत विविध उपक्रम राबविले आहेत. शाळेचा परिसर हिरवागार करण्याबरोबर गावातही प्रत्येक घरासमोर वृक्ष लागवड करण्यासाठी ते प्रबोधन करतात.

खडकाळ माळरानावर लावली झाडे
माळरानावरील शाळेच्या आवारात वाघमारे यांनी लिंबू, कडुनिंब, करंज, चिंच, नारळ, सीताफळ, गुलमोहोर अशी वेगवेगळ्या प्रकारची ७० झाडे लावली आहेत. प्यायला पाणी नसल्याने झाडांना कोठून पाणी द्यायचे, असा प्रश्‍न होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com