टेंभू, ताकारी सटकले; म्हैसाळ लटकले

टेंभू, ताकारी सटकले; म्हैसाळ लटकले

सांगली - ताकारी उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू झाले, टेंभू योजनेच्या आवर्तनाचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हैसाळ योजना मात्र लटकली आहे. या योजनेच्या वसुलीसाठीची यंत्रणाही सध्या ठप्प आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सुरू कसा होणार, हे कोडे आहे. कालव्यात भजन करून शेतकऱ्यांनी मागणी केली असली तरी पैसे वसूल झाल्याशिवाय वीजपुरवठा जोडला जाणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. किमान १७ कोटी रुपयांची तजवीज करण्याचे आव्हान आहे.

जानेवारी महिना उजाडला की तीनही उपसा सिंचन योजनांचे कवित्व सुरू होते. यंदा उशिरा पाऊस झाल्याने अजून काही प्रमाणात भूगर्भातील पाण्याची उपलब्धता आहे. ती हळूहळू तळाला जाईल, तसा शेतकऱ्यांचा रेटा वाढत जाणार आहे. म्हैसाळ योजनेच्या कार्यक्षेत्रातील काही भागातून आता मागणी जोर धरू लागली आहे. त्याचा पहिला झटका शेतकऱ्यांनी कालव्यात आंदोलन करून दिला आहे. मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ तालुक्‍यात या योजनेवर ऊस, द्राक्ष, डाळिंब आणि भाजीपाला पिकाचे क्षेत्र प्रचंड मोठे आहे. पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक ऊस तोड झाली आहे. आता नव्याने उसाला पाण्याची 
गरज आहे. 

कुणाची किती थकबाकी

  •  म्हैसाळ...............३४ कोटी, वसुली  ठप्प

  •  टेंभू.....................२२ कोटी, वसुली १० कोटी

  •  ताकारी.................१० कोटी, वसुली सुमारे ६ कोटींवर

दुसरीकडे टेंभू आणि ताकारी योजना सुरू करण्यासाठीच्या हालचाली गतिमान झाल्या आणि तेथे मार्गही मोकळा झाला. साखर कारखान्यांच्या पुढाकाराने ते शक्‍य झाले. केन ॲग्रो, सोनहिरा, ग्रीन पॉवर आदी कारखान्यांनी भार उचलून पैसे भरले आहेत. त्यामुळे टेंभू, ताकारी योजना सटकली आहे. म्हैसाळ योजनेचे त्रांगडे विचित्र आहे. या पाण्यावर ऊस पिकतो, मात्र साखर कारखाने पैसे भरायला सकारात्मक नाहीत. द्राक्ष व बेदाणा उत्पादन जास्त आहे. त्यांच्याकडून वसुली करण्याचे मार्ग नाही. बांधावर  जाऊन वसुलीला पाटबंधारेकडे यंत्रणा नाही. आता पाणीवापर सोसायट्यांची पर्याय पुढे आला आहे, मात्र तहान लागल्यावर विहीर खोदण्यातला हा प्रकार यंदाही सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com