नाटकासाठी संवादाचे पूल बांधावेत!

जयसिंग कुंभार
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

नाटके पाहायला पाच-सहाशेंचा प्रेक्षक नाट्यगृहात असतो. या हौशी कलावंतांना संधीची अनेक दारे खुली होत आहेत. ही सारी कोंडी फोडायची कशी? आज रंगभूमीदिनाच्या निमित्ताने हा विचार व्हायला हवा.

नाटक-कार्यक्रम भावे नाट्यमंदिरला आहे, असं म्हटल्यावर भावे नाट्यमंदिर कुठे आहे, असा प्रश्‍न बऱ्याचदा विचारला जातो. असा अनुभव एका जुन्या जाणत्या नाटक ठेकेदाराने सांगितला. गेल्या वर्षभरात व्यावसायिक नाट्यप्रयोगांची संख्या किती, तर अवघी पाच-सहा. सांगलीत नाटक करायला परवडत नाही, अशी बड्या नाट्यकलावंतांची नेहमीची तक्रार. त्याचवेळी चार-पाचशे रुपयांचे तिकीट काढून नाटकाला यायचे कसे, असा सामान्य नाट्यरसिकाचा प्रश्‍न असतो. त्याचवेळी राज्य नाट्य स्पर्धेत वीसहून अधिक संस्था सहभागी होतात. त्यांची नाटके पाहायला पाच-सहाशेंचा प्रेक्षक नाट्यगृहात असतो. या हौशी कलावंतांना संधीची अनेक दारे खुली होत आहेत. ही सारी कोंडी फोडायची कशी? आज रंगभूमीदिनाच्या निमित्ताने हा विचार व्हायला हवा.

कधी काळी महाराष्ट्रातील कोणताही नाट्यनिर्माता सांगलीतच प्रारंभाचा प्रयोग करायचा. आता नाट्यनिर्माते पुणे-मुंबई-नाशिकपलीकडे फिरकायला तयार नाहीत. अगदी कोल्हापूरला आले तरी सांगलीत येतीलच असे नाही. गेल्या वर्षभरातील व्यावसायिक नाट्यप्रयोगांची संख्या लक्षात घेतली तरी हे सत्य पुढे येते. ‘अतिथी देवो भव..,’ ‘आई रिटायर होते...’ ही दोन नाटके साखळी योजनेतून झाली. प्रशांत दामलेंचे ‘साखर खाल्लेला माणूस,’ ‘कार्टी काळजात घुसली,’ ‘सुनेच्या राशीला सासू’ आणि ‘यु टर्न-२’ अशी अवघी चार नाटके निखळ तिकीट लावून झाली. चर्चेतल्या चेहऱ्याचे नाटक आर्थिकदृष्ट्या फायद्यात पडायचे म्हटले तर पावणेदोन लाखांचा गल्ला जमला पाहिजे, अशी निर्मात्यांची पूर्वअट. त्यामुळे असं धाडस करायलाच कोणी धजावत नाही. ग्रामीण महाराष्ट्रात व्यावसायिक नाटके व्हावीत यासाठी शासनाने अनुदान योजना जाहीर केली आहे. अ श्रेणीत नाटकासाठी २५, तर ब श्रेणीसाठी प्रती प्रयोग १५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. मात्र तरीही सांगलीसारख्या शहरांकडे कोणी  फिरकत नाही. नाटकाची आवड असणारा नाट्यवेडा सांगलीकर आजही मोठ्या संख्येने आहे. नाटकाची  गणित बसवण्यासाठी नाट्य साखळी योजना तयार झाल्या. मात्र त्यांचेही आर्थिक गणित रुजले नाही.  

सांगलीत राज्य नाट्य स्पर्धेत किमान वीसहून अधिक संघ सहभागी होत असतात. शिवाय अनेक महाविद्यालयांचे नाट्य संघ आहेत. पु. ना. गाडगीळ सराफ पेढीने गेल्यावर्षीपासून एकांकिका स्पर्धा सुरू केल्या आहेत. महापालिकेने लाखांच्या बक्षिसासाठी एकांकिका स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी घेतली. एकूणच हौशी रंगभूमीवर नाटकाच्या ओढीने अनेक उपक्रमांची रेलचेल सुरू आहे. यातले अनेक नाट्यकलावंत टीव्ही मालिकांमध्ये आपले नशीब आजमावत आहेत. या सर्वच कलावंतांची चांगले व्यावसायिक नाटकदेखील निकड आहे. हे सारे वर्तमान थिजले आहे. त्याची कोंडी फोडण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. एका बाजूला सांगली-मिरजेत व्यावसायिक नाटकांचा दुष्काळ असताना तालुकास्तरावर व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होण्याची कल्पनाही मुश्‍कील.  गेल्या काही वर्षांत व्यावसायिक प्रयोगांची रोडावत चाललेली संस्था पाहता नाट्यपंढरी हे बिरुद फक्त नावापुरतेच  उरेल. त्याआधी शहरातील नाट्यकर्मींनी नाटकाच्या व्यावसायिक गणित जमवले पाहिजे. कलावंतासाठी मोफत निवास व्यवस्था, शनिवार-रविवारी नाट्यगृह बुकिंगासाठी प्राधान्य, साखळी योजनांचे पुनरुज्जीवन, जिल्ह्यातील अन्य नाट्य संस्थासोबत संवाद वाढवणे, ग्रामीण भागासाठी नाट्यकार्यशाळा अशा विविध उपायांकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. नाट्य परिषद, विद्या मंदिर समिती, देवल सारख्या मातृसंस्थांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. संवादाचे पूल बांधावेत अन्यथा रंगभूमी दिन केवळ उपचार ठरण्याचीच शक्‍यता आहे.

Web Title: Sangli News Theater day special