सांगलीत एकाच दिवशी तीन खून

सांगलीत एकाच दिवशी तीन खून

सांगली - जिल्ह्यात आज तीन खुनांचे प्रकार उघडकीस आले. माडग्याळमध्ये (ता. जत) दोन पत्नींच्या भांडणाला वैतागून पती आणि पत्नीनेच एकीचा काटा काढला; तर कुपवाड (ता. मिरज) येथे अनैतिक संबंधातून एकाचा चौघांनी बेदम मारहाण करून खून केला. तिसरा खून कडेगाव तालुक्‍यात हिंगणगाव खुर्द येथे दोन कामगारांच्या भांडणातून झाला. दारूच्या नशेत त्यांच्यात किरकोळ भांडण झाले. यातून एकाने दुसऱ्याचा लाकडी ओंडक्‍याने खून केला. 

माडग्याळमध्ये पत्नीचा काढला काटा

माडग्याळ - भांडणातून माडग्याळ येथील राधाबाई तिप्पाण्णा माळी (वय ५०) यांचा पती तिप्पाण्णा गंगाराम माळी व तिची सवत विमल यांनी खुरपे, दगडाने ठेचून खून केला. ही घटना काल (ता. २२) रात्री १२ वाजता घडली. दुपारी सांगलीहून श्‍वानपथक आले. ते तिप्पाण्णा माळी यांच्या घरात गेले. उमदी पोलिसांनी  तिप्पाण्णा व दुसरी पत्नी विमल या दोघांना अटक केली आहे.

तिप्पाण्णा गंगाराम माळी याचे मूळ गाव मोरबगी (ता. जत) आहे. त्याच्या आईला माडग्याळ येथे जमीन मिळाल्याने तो पस्तीस वर्षांपूर्वी येथे आला. तीस वर्षांपूर्वी त्याचा विवाह माडग्याळ येथील राधाबाईसोबत झाला. त्यांना मुलगी आहे. तीन वर्षांनंतर पती-पत्नीत वाद सुरू झाले. राधाबाईचे माहेर गावातच असल्याने ती माहेरी गेली. त्यानंतर तिपाण्णाने विमलबरोबर दुसरा विवाह केला. तिला दोन मुली व दोन मुले आहेत. तिप्पाण्णा गावात हमाली करून उदरनिर्वाह करीत होता. ग्रामपंचायतीच्या जागेत शेड मारून तो कुटुंबासह राहत होता.
राधाबाई मोलमजुरी करीत होती. दोन वर्षांपूर्वी राधाबाईने तिप्पाण्णाच्या शेजारी शेड मारून राहण्यास आली. तिथून वादाला सुरुवात झाली. रोज राधाबाई व विमल यांचा वाद होत होता. तिप्पाण्णा हा विमलकडे राहत होता. भांडणतंटे वाढत गेले.

काल रात्री राधाबाई झोपी गेली होती. त्यावेळी तिप्पाण्णा व विमलने त्यांच्यावर हल्ला केला. खुरपे, दगड व हमाल हुकाने तोंडावर डोक्‍यात वार केले. तिचा जागीच मृत्यू झाला. दोघांनी मृतदेह घराबाहेर आणून टाकला. 

सकाळी शेजाऱ्यांनी हे दृश्‍य पाहिले. त्यांनी उमदी पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे व फौजदार प्रवीण सपांगे घटनास्थळी पोचले. 

अनैतिक संबंधातून कुपवाडला तरुणाचा गेम 
कुपवाड - अनैतिक संबंधातून शहरातील एका तरुणाचा चौघांनी केलेल्या मारहाणीत खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. त्याचा मृतदेह कृष्णा नदीत फेकून दिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. सागर भीमराव माळी (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी संशयित रमेश सिद्राम सूर्यवंशी याच्यासह अन्य तीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

मृत सागर माळी व संशयित रमेश सूर्यवंशी हे दोघेही कापसे प्लॉटमध्ये शेजारीच रहात होते. ते ड्रायव्हर म्हणून काम करतात. सागर याचे सूर्यवंशी याच्या पत्नीबरोबर अनेक महिन्यापासून अनैतिक संबंध होते. यातून माळी व सूर्यवंशी यांच्यात वाद झाला होता. शहरातील काही नागरिकांनी या दोघातील व पती पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी केली होती. 

गेल्या आठवड्यात संशयित सूर्यवंशी याची पत्नी घरातून गायब झाली. तशी फिर्याद त्याने कुपवाड पोलिसात दाखल केली होती. सूर्यवंशी व त्याचे साथीदार सागर माळी व रमेशच्या पत्नीचा शोध घेत होते. माळी त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात सापडला.
संशयित रमेश सूर्यवंशी याच्यासह साथीदारांनी गुरुवारी रात्री माळीला आपल्यासोबत घेतले आणि कुपवाडमध्ये आले. त्याला शहराच्या बाहेर मिरजेच्या बाजूला बडेपीर दर्गा परिसरात नेऊन बेदम मारहाण केली. यात माळीचा मृत्यू झाला. त्यानंतर सूर्यवंशी आणि त्याच्या साथीदारांनी सागरचा मृतदेह सांगलीतील कृष्णा नदीच्या पुलावरून नदीत फेकून दिला. 
घटनेनंतर सूर्यवंशी स्वतः कुपवाड पोलिस ठाण्यात आज सकाळी हजर झाला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आज दिवसभर सागरचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. मात्र त्याचा मृतदेह सापडला नाही.

हिंगणगाव खुर्दमध्ये कामगाराचा खून

कडेगाव - हिंगणगाव खुर्द (ता. कडेगाव) येथे दोन परप्रांतीय हळद काढणी कामगारांमध्ये दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यातून रागाच्या भरात एका अल्पवयीन हळद कामगाराने दुसरा कामगार गोविंद उदगे (वय २०, रा. चिरई, ता. नारायणगंज, जि. मंडला, मध्य प्रदेश) याच्या डोक्‍यात लाकडी ओंडका मारून त्याचा खून केला. ही घटना काल (ता. २२) रात्री दहा वाजता येथे घडली.

याबाबत पोलिस पाटील दत्तात्रय बबन जाधव यांनी कडेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे. हिंगणगाव खुर्द येथे चंद्रकांत संतोष जाधव यांच्या शेतात हळदीचे पीक काढणीचे काम मध्य प्रदेश येथील कामगारांना करत होते. गुरुवारी रात्री अल्पवयीन कामगार व गोविंद उदगे यांनी दारू प्राशन केली. त्यानंतर रात्री ते हळद काढणीचे काम करत असताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण सुरू झाले. अल्पवयीन कामगाराला राग अनावर झाल्याने त्याने दारूच्या नशेत जवळच्या लाकडी ओंडक्‍याने गोविंद उदगे यांच्या डोक्‍यात, पाठीत मारहाण करून खून केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com