‘कॅन्डल मार्च’द्वारे अनिकेतला श्रद्धांजली

‘कॅन्डल मार्च’द्वारे अनिकेतला श्रद्धांजली

सांगली - अनिकेत कोथळे यांच्या पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी सर्व पक्षीय कृती समितीने शहर पोलिस ठाण्यावर ‘कॅन्डल मार्च’ काढून ‘क्रूरकर्मा उपनिरीक्षक युवराज कामटेला फाशी झालीच पाहिजे’ अशा घोषणा देऊन पोलिस ठाणे परिसर दणाणून सोडला. काही क्षण स्तब्धता पाळून श्रद्धांजलीही वाहिली. 

अनिकेत कोथळेला चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून अटक करून ‘थर्ड डिग्री’ वापरली. त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उपनिरीक्षक कामटेसह साथीदारांवर  गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस क्रौर्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ सर्व पक्षीय कृती समितीने सोमवारी ‘सांगली बंद’चे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद मिळाला. आज समितीने ‘कॅन्डल मार्च’ आयोजित केला. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास बस स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून कॅन्डल मार्चला सुरवात झाली. कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने मेणबत्ती घेऊन सहभागी झाले होते.

अनिकेतच्या मृत्यूच्या घटनेचा निषेध करणारे विविध फलक घेऊन कार्यकर्ते कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले. ‘युवराज कामटेला फाशी झालीच पाहिजे’, ‘अनिकेतच्या कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा देत मारुती रस्ता, हरभट रस्ता मार्गे सर्वजण पोलिस ठाण्यासमोर आले. तेव्हा मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता. पोलिस ठाण्यासमोरील फुटपाथच्या रेलिंगवर सर्वांनी मेणबत्त्या लावून अनिकेतला श्रद्धांजली वाहिली. जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

पृथ्वीराज पवार म्हणाले,‘‘सर्व पक्षीय कृती समितीच्या नेतृत्वाखाली सांगलीकर एकवटले आहेत. अनिकेतच्या मृत्यूच्या घटनेच्या निमित्ताने आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत. त्या ऐकणार नसाल तर पुन्हा आंदोलन करावे लागेल. भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून आमचे आंदोलन आहे. २५ नोव्हेंबरला पुन्हा महामोर्चा काढला जाणार आहे. खासदार राजू शेट्टींसह अनेक नेते त्यात सहभागी होतील.

कॅन्डल मार्चमध्ये सतीश साखळकर, संजय बजाज,  महेश खराडे, असीफ बावा, डॉ. संजय पाटील, शंकर पुजारी, बापूसाहेब पाटील, महेश पाटील, अशरफ वांकर, किरणराज कांबळे, अमर पडळकर, उमेश देशमुख, सागर घोडके, ज्योती आदाटे, रेखा पाटील आणि मृत  अनिकेतचे कुटुंबीय सहभागी झाले.

मिलिंद भारंबे, दिलीप सावंत हवेत
कॅन्डल मार्चमध्ये अनिकेतच्या मृत्यूच्या घटनेच्या निषेधार्थ फलक झळकले. काही फलकांवर आम्हाला पोलिस अधिकारी ‘मिलिंद भारंबे...दिलीप सावंत हवेत’, ‘व्यंकटचलम..रामराव वाघ हवेत’ असे लिहिले होते. ते फलक लक्ष वेधून घेत होते.

‘उपाधीक्षक काळेंना सहआरोपी करा’
पोलिस उपाधीक्षक दीपाली काळे  यांना सहआरोपी करा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा आज शिवसेनेने दिला. वरिष्ठ अधिकारी दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश द्यावेत. अशा लोकांच्या प्रयत्नांना भीक घालू नका, असे आवाहनही करण्यात आले. निवेदनावर जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभूते, उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर यांच्या सह्या आहेत.
पत्रकात म्हटले आहे, की काळे यांनी माध्यमांची प्रारंभपासून दिशाभूल केली. कामटे आपल्या संपर्कात असून पळून गेलेले आरोपी शोधत असल्याचे सांगितले. अप्पर पोलिस अधीक्षकांच्या समोर त्यांनी अनिकेतची पत्नी व त्याच्या भावाला दमात घेतले. तुमचा माणूस पळून गेला आहे. उद्या त्याला समोर उभा करते. तुम्ही राजकीय लोकांना आणून स्टंट करता, भंडारेला कामटेने कोणताही सोर्स नसताना कौशल्याने निपाणीत जाऊन पकडले आहे. तसेच अनिकेतलही पकडून आणतो, असे सांगून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न काळे यांनी केला. विशेष म्हणजे त्या काळात महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील सांगलीत होते. पोलिस अधीक्षकांनीही त्यावेळी भरपूर फोनाफोनी केली. या सर्वांचे पोलिस मुख्यालयातील  कॉल डिटेल्स घ्यावेत. काळे यांना वाचवू नका. पोलिस प्रमुखांना हटवा. नांगरे-पाटील यांनी ‘नरो वा कुंजरोवा’ ची भूमिका सोडावी. सत्य जनतेसमोर ठेवावे. अन्यथा त्यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांना जिल्ह्याबाहेर हाकलण्यासाठी आंदोलन करावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com