मालगावात अडीच लाखांचा गांजा जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

मालगाव - येथील सिद्धेवाडी रस्त्यावर एका शेतकऱ्याने उसाच्या शेतात लावलेली गांजाची ५६ झाडे आज पोलिसांनी जप्त केली. झाडांचे वजन ८२ किलो आणि किंमत अडीच लाख रुपये आहे. ही कारवाई मिरज ग्रामीण पोलिस ठाणे आणि पोलिस उपाधीक्षक कार्यालयाने संयुक्तपणे केली आहे. या कारवाईमुळे मालगावातील अनेक अवैध व्यवसायापैकी गांजा तस्करीसारख्या अवैध व्यवसायाचा उलगडा झाला आहे. 

यासंदर्भात मनोहर बोधा गावडे (वय ६०) या  शेतकऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मालगावात बनावट दारू, मटका आणि अमली पदार्थांची तस्करी यासारखे अवैध व्यवसाय गेल्या काही वर्षांत जोमाने फोफावले आहेत. स्थानिक राजकीय टग्यांनी पोलिसांचे आशीर्वाद विकत घेऊनच अवैध व्यवसायाचे साम्राज्य पसरवले. यात गांजाची शेती तर राजरोसपणे केली जाऊ लागली. यात गुंतलेल्या काही हुशार टग्यांनी गावातील अगदी निरक्षर, अडाणी, शेतकऱ्यांना भरीस घालून  गांजाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.

त्यापैकी बहुसंख्य झाडे ही म्हैसाळ कालव्याशेजारील शेतात आहेत. कालव्याच्या पाण्याचा असाही अचूक वापर या टग्यांनी अडाणी शेतकऱ्याच्या माध्यमातून केला आहे. अशाच प्रकारे मालगाव सिद्धेवाडी रस्त्यावर मनोहर  गावडे यांच्या शेतात तब्बल ५६ झाडांची लागवड करण्यात आली होती. त्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पूर्ण तयारीने या शेतात अचानक धाड टाकून  ही ५६ झाडे आज जप्त केली. 

या कारवाईने मालगावात एकच खळबळ उडाली. बनावट दारू गायब झाली. मटका मात्र गावात वरिष्ठ अधिकारी येऊनही राजरोसपणे सुरू होता. उपाधीक्षक डी. एस. पाटील, पोलिस निरीक्षक  मोहन जाधव यांनी कारवाई केली.