ड्रेनेजमध्ये पडून दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

सांगली - कोल्हापूर मार्गावर महापालिकेच्या मलनि:सारण केंद्राच्या ड्रेनेजमध्ये पाणीपातळी पाहण्याच्या प्रयत्नात विषारी वायूने चक्कर येऊन आत पडलेल्या दोघांचा मृत्यू झाला. अभियंता उमाकांत प्रभाकर देशपांडे (वय ४४, रा. पत्रकारनगर, सांगली), विठ्ठल रामलिंग शेरेकर (४५, रा. शंभर फुटी रोड, हनुमाननगर) यांचा मृत्यू झाला

सांगली - कोल्हापूर मार्गावर महापालिकेच्या मलनि:सारण केंद्राच्या ड्रेनेजमध्ये पाणीपातळी पाहण्याच्या प्रयत्नात विषारी वायूने चक्कर येऊन आत पडलेल्या दोघांचा मृत्यू झाला. अभियंता उमाकांत प्रभाकर देशपांडे (वय ४४, रा. पत्रकारनगर, सांगली), विठ्ठल रामलिंग शेरेकर (४५, रा. शंभर फुटी रोड, हनुमाननगर) यांचा मृत्यू झाला. हा प्रकार आज दुपारी चारच्या सुमारास घडला. घटनेने खळबळ माजली. दरम्यान, या दोघांना वाचवण्यासाठी उतरलेले दोघे कर्मचारी अत्यवस्थ झाले होते. हे सर्व कर्मचारी ॲक्‍वाटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आहेत. 

कोल्हापूर मार्गावर महापालिकेचे मलनि:सारण केंद्र आहे. तेथे शहरातील ड्रेनेजचे पाणी येते. ते दुरुस्त करून वापर करण्याची योजना आहे. त्यासाठी या ड्रेनेजचे काम सुरू होते. हे काम ठेकेदार कंपनीतर्फे करण्यात येत होते. हे सर्व कर्मचारी ॲक्‍वाटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आहेत. दुपारी चारच्या सुमारास तेथे शेरेकर, देशपांडे, जयंत सदाशिव कोतमिरे (वय ३०, रा. कोगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) आणि संजय सदाशिव माळी (२४, रा. कवलापूर) हे काम करण्यासाठी आले होते.

भारतभीम जोतिरामदादा सावर्डेकर कुस्ती केंद्राच्या जवळच हे केंद्र आहे. तेथील ड्रेनेजची पाणीपातळी पाहण्यासाठी प्रथम शेरेकर खाली उतरले, त्या वेळी आतील विषारी वायूमुळे त्यांना चक्कर येऊन ते कोसळले. ते पाहताच अभियंता देशपांडे हे त्यांना वाचविण्यासाठी खाली उतरले. त्यांनाही वायूने चक्कर येऊन तेही पाण्यात कोसळले.

या वेळी दुसरे दोघे कर्मचारी वरच होते. त्यांनी आरडाओरड करून आखाड्यातील पैलवानांना हाका मारल्या आणि आतील दोघांना वाचवण्यासाठी कमरेला दोर बांधून आत उड्या मारल्या; मात्र आतील तीव्र वायूने त्यांनाही चक्कर आली. तोवर तेथे दोन पैलवान पोचले. त्यांनी अत्यवस्थ झालेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. मात्र उमाकांत देशपांडे व रामलिंग शेरेकर यांचा जागीच मृत्यू झाला; तर जयंत कोतमिरे व संजय माळी यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना समजताच महापौर हारुण शिकलगार, आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. तसेच त्यांना वाचवणाऱ्या पैलवानांनाही तेथे बोलावून त्यांचीही तपासणी केली.

अग्निशमन पथक तत्काळ दाखल
दरम्यान, ही घटना समजताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोचले. शहर पोलिसही तेथे दाखल झाले. त्यांनी तातडीने चौघांना बाहेर काढले; मात्र शेरेकर आणि देशपांडे मयत झाले होते; तर माळी आणि कोतमिरे यांनाही त्रास झाला होता. सर्वांनाच वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

Web Title: Sangli News two workers dead in Drainage