शनिवारी मुख्यमंत्री "हुतात्मा' वर - वैभव नायकवडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

सांगली - वाळवा येथील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या नव्याने उभारलेल्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्‌घाटन शनिवारी (ता. 25) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

सांगली - वाळवा येथील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या नव्याने उभारलेल्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्‌घाटन शनिवारी (ता. 25) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

हुतात्मा उद्योग समूह आणि राज्य कबड्डी असोसिएशनच्या 44 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धाही त्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहे. 40 हजार लोक उपस्थित राहतील. त्याचे उद्‌घाटन श्री. फडणवीस यांच्या हस्ते होईल, असेही त्यांनी सांगितले. 

पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, इथेनॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार राजू शेट्टी, संजय पाटील, साखर आयुक्त संभाजीराव कडू-पाटील यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्ता पाथ्रीकर, रामभाऊ घोडके उपस्थित राहतील. 

श्री. नायकवडी म्हणाले,""स्पर्धेत टिकण्यासाठी, ऊस उत्पादकांना रास्त दर देण्यासाठी इथेनॉलसह आसवणी प्रकल्पाची उभारणी गरजेची असल्याने उपपदार्थ निर्मितीचा निर्णय घेतला. इथेनॉलच्या मिळणाऱ्या अतिरिक्त निधीतून उसाला जास्त दर देणे शक्‍य होईल. प्रतिदिन 30 हजार लिटरचा प्रकल्प आहे. इथेनॉल ग्रीन फ्युएल म्हणून पेट्रोलियम कंपन्यांना पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी पुरवठ्यास कारखान्यास मंजुरी मिळाली. 44 कोटींचा प्रकल्प गुजरातच्या नरेन लालांनी पर्यावरणपूरक केला आहे. इथेनॉलचा सध्याचा दर 40.85 रुपये लिटर आहे.'' 

क्रीडा स्पर्धांचे आयोजन

स्पर्धेबाबत ते म्हणाले,"25 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी राज्यातून 800 खेळाडू, पंच, व्यवस्थापक येतील. नागनाथण्णांच्या प्रेरणेने हुतात्मा संकुलाने खेळाची परंपरा जोपासली. "हुतात्मा' विद्यालयाच्या क्रीडांगणावर 20 वर्षांच्या आतील मुला-मुलींच्या राज्य संघाची निवड चाचणी आहे. स्पर्धेतून देशपातळीवर राज्याचा संघ निवडला जाईल. सकाळी-सायंकाळी दोन सत्रात स्पर्धा आहेत.'' 

क्रांतिीवीर नागनाथअण्णांच्या स्मारकाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. शेतकरी, साखर कामगार पुतळ्याचा खर्च करणार आहेत. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार येथे "सहकार प्रशिक्षण केंद्र' होईल. तसा प्रस्ताव दिला आहे. प्रशिक्षणाचे येथे एक आदर्श मॉडेल तयार केले जाईल. 
- वैभव नायकवडी, 
अध्यक्ष, हुतात्मा' समूह 
 

Web Title: Sangli News Vaibhav Naikwadi press