‘विराज केन्स’च्या उभारणीने स्वप्नपूर्ती - सदाशिवराव पाटील

‘विराज केन्स’च्या उभारणीने स्वप्नपूर्ती - सदाशिवराव पाटील

विटा - साखर कारखानदारीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असा शेतकऱ्यांना अभिमान व आपला वाटेल असा कारखाना उभा करण्याचे माझे स्वप्न होते. ते स्वप्न साकार करण्यासाठी विराज शुगर कारखान्याची उभारणी अनेक अडचणींवर मात करीत केली आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेने विराज कारखाना गळीत हंगाम सुरु होईल, असे प्रतिपादन माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील यांनी दिली.

आळसंद (ता. खानापूर) येथे विराज केन्स शुगर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील,कार्यकारी संचालक विशाल पाटील, संचालक आनंदरावशेठ देवकर, उत्तमशेठ पाटणकर,राजेंद्र माने, अशोकशेठ मोरे, गोविंदराव  भोसले, संग्राम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी आमदार पाटील म्हणाले, मी माझ्या आयुष्यात कुणाच्याही आडवे गेलो नाही, तक्रार केली नाही परंतु चांगले काम करीत असताना मला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मला काय मिळतंय  त्यापेक्षा किती लोकांचा त्या उद्योगापासून उदरनिर्वाह होतो हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही उभारलेल्या विटा अर्बन बँक, पतसंस्था, आदर्श शैक्षणिक संकुल, विराज स्पिनर्स सूतगिरणी, विराज दुध संघ या सर्व  संस्था सक्षम व पारदर्शकपणे सुरु आहेत. साखर कारखानदारी क्षेत्रात आपण नवीन असल्याने प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकत कारखाना चालविणार आहे. सर्वच कारखान्यांना उसतोड यंत्रणा कमी आहे. परंतु आपला कारखाना पूर्णक्षमतेने चालवायचा आहे. पुढच्या वर्षी जिल्ह्यात सर्वप्रथम आपल्या कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होईल आणि सर्वात शेवटी गळीत हंगाम संपेल. कारण आपला कारखाना कंपनी अॅक्ट खाली चालवीत आहोत. त्यामुळे आपल्याला गळीत हंगाम सुरु करण्यासाठी शासनाची ना साखर आयुक्ताची परवानगी घ्यावी लागणार नाही. त्यामुळे पुढील वर्षी आपला गळीत हंगाम लवकर सुरु होईल.

प्रास्ताविक संचालक संग्राम देशमुख यांनी केले. यावेळी श्रीकांत पाटणकर, अमित भोसले, जनरल मॅनेजर अशोक नलवडे, चीफ इंजिनियर शरद उथळे, शेती अधिकारी आर.के.पवार, चीफ केमिस्ट एस. जांभळे, शरद बसागरे, गंगाधर लकडे, दत्तोपंत चोथे, विलास कदम, बी.आर. पाटील, संजय मोहिते, चंदूनाना पाटील यांच्यासह शेतकरी, कारखान्याचे अधिकारीव कर्मचारी उपस्थित होते. आभार सरव्यवस्थापक अशोक नलवडे यांनी मानले.

सुसज्ज मेडिकल कॉलेज उभारणार

आरोग्याची सेवा दिली तर तालुका सर्वच बाबतीत सुजलाम सुफलाम होईल. चांगल्या आरोग्याची सुविधेची गरज आहे. त्यामुळे सुसज्ज मेडिकल कॉलेज उभा करणे हे माझे शेवटचे स्वप्न आहे. ते स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मी कटीबद्ध असे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.

अनेक अडचणीवर मात करीत  विराज केन्स कारखान्याची उभारणी केली आहे. शेतकरी हिताला प्राधान्य दिले जाणार आहे. एफआरपीप्रमाणे ऊस दर दिला जाणार आहे. तोडणी झालेला ऊस २४ तासांच्या आत गाळप केला जाईल. ६ तासाच्या आत ऊसाचे गाळप करून संबधित शेतकऱ्याला ऊसाचे वजन, साखर उतारा, बिलाची माहिती एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र राहून कारखाना चालविला जाईल. चाचणी गळीत हंगाम विराज साखर कारखाना पूर्ण क्षमतेने यशस्वीरित्या पूर्ण करेल.

- विशाल पाटील, कार्यकारी संचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com