दीडशे एकर ढबूवर व्हायरसचा हल्ला

 प्रताप मेटकरी
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

‘‘ऊस, डाळिंब, द्राक्षासारख्या पिकांचे नुकसान झाले, की सरकारी यंत्रणा तातडीने जागी होते. नुकसानग्रस्त ढबू उत्पादकांच्या प्लॉटचे पंचनामे करून शासनाकडून योग्य मदत मिळावी. कृषी विद्यापीठांनी व्हायरसला बळी न पडणाऱ्या बियाणांचे संशोधन करावे.’’
- रेवण सूर्यवंशी 
ढबू उत्पादक, पानसेमळा

विटा - खानापूर तालुक्‍यातील पानसेमळा परिसरातील दीडशे एकर क्षेत्रातील ढबू मिरचीवर अज्ञात व्हायरसने हल्ला केला आहे. प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यांची संकटातून सुटका करण्यासाठी ‘व्हायरस’ उद्‌भवाच्या कारणांचा शोध कृषी विभाग, कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी लावावा, उपाय सांगावा, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.

दुष्काळी स्थिती असली तरी जमीन उपजाऊ आहे. इथल्या अनेक जिद्दी, कष्टाळू शेतकरी, युवकांनी कष्टाने भाजीपाल्याचे मळे फुलवलेत. ढबू, टोमॅटो, द्राक्षांचे उत्पादन घेत आहेत. त्यांची संख्या मोठी आहे. पानसेमळा, सूर्यनगर परिसरात ढबू उत्पादक गटशेती करतात. शाश्‍वत, कमी कालावधीत जास्त पैसे मिळवून देणारे पीक असल्याने ढबू उत्पादन वाढले आहे. येथे उत्पादित ढबूला मुंबई, दिल्ली, कलकत्तासारख्या शहरांत चांगली मागणी आहे. व्यापारी स्वत: बांधावर येऊन खरेदी करतात. ढबूची शेती सामान्यांना परवडणारी आहे. एकरी ३ लाख २० हजार इतका खर्च करून अनेकांनी ढबूची लागवड केली आहे. अनेकांनी बॅंकांकडून कर्जे घेऊन ढबू लावला आहे.

एप्रिलमध्ये उन्हाळा असताना पानसेमळा, सूर्यनगरातील शेतकऱ्यांनी सिझेंटाच्या इंद्रा वाणाच्या ढबूची लागवड केली. योग्य व्यवस्थापन, शास्त्रशुद्ध पध्दतीने काळजी घेतली. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधफवारणी केली; परंतु दोन - तीनदा तोड झाल्यानंतर व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. झाडांची हिरवी पाने पिवळी पडू लागली. फळनिर्मिती थांबली. हातातोंडाशी आलेले पीक वाया जात आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहे. ढबूचे पीक दुष्काळी भागात हमखास येणारे असल्याने लागण मोठी झाली. अपेक्षित उत्पादन येण्यापूर्वीच पानसेमळा, हराळेमळा, ढवळेश्‍वर, गांधीनगर, भवानीनगर, रेवानगर, पारे परिसरात प्लॉट व्हायरसच्या विळख्यात सापडलेत. 

पानसेमळा येथील रेवण सूर्यवंशी, हैबत पानसे, बाळासो जाधव, संतोष जाधव, रोहित सूर्यवंशी (प्रत्येकी १० एकर), सतीश भोसले, आबासो जाधव, सिदू जाधव, गणेश आबदर, संजय सूर्यवंशी (प्रत्येकी ५ एकर) यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या १५० एकर क्षेत्रातील ढबूचे नुकसान झाले. ढबूवर अज्ञात व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती असूनही कृषी विभागाचा एकही अधिकारी फिरकला नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.

*एकरी खर्च*
१० ट्रॉल्या शेणखत - ५० हजार
१ ट्रॉली पोल्ट्रीखत - १० हजार
मशागत - १० हजार 
रासायनिक खते, बेसल डोस व औषधे - ८५ हजार
ठिबक सिंचन - ३० हजार 
मल्चिंग पेपर - १५ हजार
रोपे - ३० हजार
कामगार मजुरी - ५० हजार
सुतळी, तार व काठी - २० हजार
साईड शेडनेट - २० हजार 
एकूण - ३ लाख २० हजार

Web Title: sangli news virus on simala mirch