पांजरपोळातील अभिनेता ‘वळू’चा निरोप

पांजरपोळातील अभिनेता ‘वळू’चा निरोप

सांगली - आपल्या मूक अभिनयाने ‘वळू’ या मराठी चित्रपटातून धुमाकूळ घालणाऱ्या सांगलीच्या पांजरपोळातील वळूने अखेरचा निरोप घेतला. गेली अनेक वर्षे सांगलीत वास्तव्यास असलेला हा तीनशे किलोंचा वळू वृद्धापकाळाने गेला. यापूर्वी हरिपूरच्या शिवऱ्या बैलाने टकरीच्या मैदानात नावलौकिक मिळवून सांगलीची पताका पश्‍चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात फडकवली होती. सांगली संस्थानच्या सुंदर गजराज आणि बबलू हत्तीनेही समस्त सांगलीकरांना लळा लावून एक्‍झिट घेतली होती. त्यानंतर या वळूने चित्रपट माध्यमाच्या रूपाने सांगलीच्या पांजरपोळाची ओळख राज्यभर पोचवली होती.

अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरलेला हा चित्रपट २००८ मध्ये प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी सांगली ‘सकाळ’च्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात या वळूची आवर्जून आठवण सांगितली होती. चित्रपटाचे नावच मुळी वळू होते. तो वळूच या चित्रपटाचा खरा नायक होता. तो कसा असावा याबद्दलची मनात अनेक चित्रे होती. त्या अनुरूप वळू सांगलीत भेटला. तब्बल तीनशेंवर वळू आम्ही राज्यभरात फिरून पाहिले आणि त्यानंतर याची निवड केल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले होते. दहशत बसावी असे लालसर डोळे, जाडजूड शिंगे आणि त्यामागे वशिंड, मजबूत देहयष्टीचा हा वळू धाक बसावी असाच होता. पुणे जिल्ह्यातील एका खेड्यात या चित्रपटाचे शूटिंग झाले. त्या गावात त्याने शूटिंगदरम्यान धमाल उडवून दिली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एका भाषणात या ‘वळू’चा उल्लेख केला होता. असा हा धमाल अभिनेता आता वृद्धत्वाकडे झुकला होता. त्याच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या. आजारपणामुळे अलीकडे त्याचे खाणे मंदावले होते. वजनही घटले होते. औषधोपचार सुरू होते; मात्र प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. गेल्या शनिवारी सकाळी त्याचे निधन झाले. त्याच्यावर पांजरपोळ संस्थेच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत जुना बुधगाव रस्त्यावरील मळ्यात दफन झाले. सांगलीची वेगळी ओळख राज्यभर पोचवणारा हा वळू काळाच्या पडद्याआड गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com