‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी सांगोला आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

सांगली - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍याने अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. पाणीपट्टीची शून्य थकबाकी असताना मिरज, कवठेमहांकाळमधील शेतकऱ्यांच्या चुकीची शिक्षा आम्हाला का, असा सवाल त्यांनी केला आहे. त्याबाबत मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ८) बैठक होणार आहे. 

सांगली - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍याने अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. पाणीपट्टीची शून्य थकबाकी असताना मिरज, कवठेमहांकाळमधील शेतकऱ्यांच्या चुकीची शिक्षा आम्हाला का, असा सवाल त्यांनी केला आहे. त्याबाबत मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ८) बैठक होणार आहे. 

दरम्यान, वीज बिलाचे २७ कोटी रुपये वसूल करण्यासाठी पाटबंधारे विभागाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या दारात जाण्याचा निर्णय घेतला आहे. १० ते ३१ ऑगस्टपर्यंत ही मोहीम राबवली जाईल. त्यासाठी प्रत्येक गावात एक समिती स्थापन होईल. ही समिती आणि पाटबंधारे विभागाचे कर्मचारी संयुक्तपणे लोकप्रबोधनाचा कार्यक्रम राबवतील. आतापर्यंत त्याला फारसे यश आलेले नव्हते; मात्र यंदाची स्थिती बिकट आहे. बागायती क्षेत्रावरील संकटाची छाया गडद होत आहे. म्हैसाळ योजना सुरू झाली तरच ऊस, द्राक्ष, डाळिंब पिकांची वाटचाल सुकर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, किमान वीज बिलाएवढी रक्कम जमा करावी, असे आवाहन पाटबंधारे विभाग करणार आहे. या स्थितीत सांगोला तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत सरकारची कोंडी केली आहे. येथे आमदार गणपतराव देशमुख यांनी पालकमंत्री सुभाष देशमुख यांना कोंडीत पकडले होते. सांगोला तालुक्‍यातील लाभधारक शेतकरी पैसे भरतात, मग त्यांना पाणी का देत नाही? मिरज, कवठेमहांकाळमधील  शेतकरी पैसे भरत नाहीत, त्याची शिक्षा आम्हाला का, असा स्पष्ट सवाल त्यांनी अनेकदा केला आहे. या पार्श्‍वभूमीवर मिरज, तासगाव, कवठेमहांकाळची जबाबदारी वाढली आहे. पाणीपट्टी भरून सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी केले आहे.

यंदा परिस्थिती गंभीर
म्हैसाळ योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल होतच नाही, ही गंभीर परिस्थिती आहे. अशा वेळी नाना ढोंग करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सपशेल फसलेला आहे. म्हैसाळ पाणी व्यवस्थापनाचा विभाग स्वतंत्र केला तरी फरक पडला नाही. आता पाणीवापर सोसायट्या स्थापन होत आहेत. दरवर्षी प्रबोधन वर्ग होत असतो. यंदा परिस्थिती फारच गंभीर आहे.

२७ कोटी थकबाकी
म्हैसाळ योजनेची वीज बिल थकबाकी २७ कोटी रुपये आहे. त्यापैकी किती पैसे भरले तर वीजपुरवठा सुरू होईल, असे पत्र पाटबंधारे विभागाने महावितरणला दिले होते. त्यांनी किमान १६ कोटी ५० लाख रुपये भरा, असे स्पष्ट सांगितले आहे. गेल्या वर्षी ७.७५ कोटी रुपये भरले गेले होते. त्यात शेतकऱ्यांचे २.७५ कोटी होते, तर महामंडळाने ५ कोटी भरले होते. 

लाभक्षेत्रात पाऊसच नाही
म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्माही पाऊस झालेला नाही. गतवर्षी मिरज तालुक्‍यात सरासरीच्या २६० टक्के पाऊस झाला होता. यंदा तो ६४ टक्के आहे. कवठेमहांकाळला गतवर्षी २९० टक्के पाऊस होता, यंदा १३३ टक्के आहे. तासगावला १५० टक्के होता, यंदा ४८ टक्के आहे.

Web Title: sangli news water