शेती योजनांचे पाणी स्वस्त होणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

टेंभू, ताकारी-म्हैसाळला लाभ - मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर नवे दर

टेंभू, ताकारी-म्हैसाळला लाभ - मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर नवे दर
सांगली - टेंभू, ताकारी, म्हैसाळसह राज्यातील उपसा सिंचन योजनांच्या पाणीपट्टीचे पीक आणि सिंचन पद्धतनिहाय संपूर्ण फेररचना केली जाणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने सादर केलेल्या प्रस्तावावर जलसंपदा विभागाककडून काम सुरू आहे. नोव्हेंबरपर्यंत मंत्रिमंडळाची मान्यता मिळण्याची शक्‍यता आहे.

शेतीसाठीचे पाणी स्वस्त होणार आहे. उसाची वार्षिक पाणीपट्टी प्रतिएकर आठ हजारांवरून दोन हजार रुपये, तर द्राक्षाची पाणीपट्टी पाच हजारांवरून 1600 ते 1800 रुपये होईल, असा अंदाज पाटबंधारे व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे नव्या प्रस्तावानुसार सिंचन योजनांच्या वीजबिलाची 81 टक्के रक्कम ही राज्य शासन भरणार आहे. 19 टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरायची आहे. अर्थात 81 टक्के रक्कम ही पाणीपट्टीच्या वसुलीतूनच भरली जाणार आहे. आकारणी मात्र स्वतंत्रपणे होणार नाही इतकेच. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी त्यालाही विरोध केला आहे. 100 टक्के वीजबिल सरकारने भरावे, अशी त्यांची मागणी आहे. पाणीपट्टीची फेररचना करताना 19 टक्के वीजबिलांसह रक्कम आकारली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावे सध्या असणारा बोजा सुमारे 75 टक्के कमी होईल. त्यानंतर तरी शेतकरी विनातक्रार पाणीपट्टी भरतील का, हा महत्त्वाचा मुद्दा असेल.

सध्याची आकारणी
ऊस - प्रतिएकर 8 हजार
द्राक्ष - प्रतिएकर 5 हजार
पाटपाणी, ठिबक एकच आकार
7 ते 8 महिने पाणी मिळणार
वीजबिल 81 टक्के सरकार भरणार
शेतकऱ्यांची जबाबदारी 19 टक्के