‘सकाळ’चे योग शिबिर बनवू परंपरा

‘सकाळ’चे योग शिबिर बनवू परंपरा

सांगली - ‘सकाळ’ने रोटरी क्‍लब आणि राजे विजयसिंह दरबार हॉल योग केंद्राच्या सहकार्याने आयोजिलेले योग शिबिर ही दरवर्षीची परंपरा बनवू. योग दिनाच्या पार्श्‍वभूमीवर पाच-सात दिवस शिबिरात योगाभ्यास करून रोजच ‘आरोग्यपूर्ण सकाळ’ उजाडेल, असा प्रयत्न करू. दरवर्षी नवनव्या घटकांना त्यात सहभागी करून घेऊ, असा संकल्प साधकांनी आज केला.  

पाच दिवसांपासून रोटरीच्या प्रसन्न हिरवळीवर महिला, पुरुष, लहानथोरांच्या सहभागाने सुरू असलेल्या शिबिराची आज योगदिनी उत्साहात सांगता झाली. शिबिराची औपचारिका सांगता झाली असली तरी ही खऱ्या अर्थाने आरोग्यपूर्ण आयुष्याची नवी सुरुवात ठरेल, अशी ग्वाही सहभागींनी दिली.   

योग विशारद बाळकृष्ण चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली शिथिलीकरण, आसने, प्राणायाम, ध्यान, संकल्प असा कार्यक्रम झाला. भल्या पहाटे कोकिळेचे मंजूळ स्वर ऐकत सोहळा रंगला. प्रार्थनेने प्रारंभ, शिथिलीकरण अभ्यासानंतर पाठ, मणका, मान, उदरसंस्थेच्या अवयवांची कार्यक्षमता वाढवणाऱ्या ताणासन, वृक्षासन, हस्तपादासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, वृष्ट्रासन, शशांकासन, वक्रासन, मकरासन, अर्धभूजंगासन, शलभासन, उत्तानपादासन, पवनमुक्तासन, शवासन आदीची साधना केली. कपालभाती क्रियेसोबत नाडीशोधन, शीतली आणि भ्रामरी या प्राणायमची जोड मिळाली. तासभराच्या योग साधनेने साधकांत उत्साह होता. निरामय आरोग्यासाठी नियमित साधनेचा संकल्प साधकांनी केला.

शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या वेलनेस फॉरएव्हरचे राजेश गंगवाणी, रोटरी क्‍लब ऑफ सांगलीचे अध्यक्ष के. के. शहा प्रमुख उपस्थित होते. त्यांचा सत्कार ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी आणि वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे यांच्या हस्ते झाला. शिबिरार्थींच्यावतीने श्री. चिटणीस यांचा सत्कार झाला.

सहयोगी संपादक श्री. जोशी म्हणाले,‘‘सकाळ माध्यम समूहाने सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेतला. दुष्काळी भागात तलावातील गाळ काढणे, पक्षी वाचवा अभियान, व्यसनमुक्ती अभियानसारखे उपक्रम राबवले. योगप्रचार, प्रसारासाठी तीन वर्ष योगदिनानिमित्त शिबिर होत आहे. भविष्यात निश्‍चितच ही परंपरा बनेल.’’

शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. साधकांत चांगला उत्साह होता. योगप्रसारासाठी असा उपक्रम दरवर्षी रोटरीतर्फे राबवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही मी देतो.
- के. के. शहा,  अध्यक्ष, रोटरी क्‍लब ऑफ सांगली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com