कृष्णा नदीत बुडणाऱ्याला युवकाच्या धाडसाने जीवदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

भिलवडी - येथील कृष्णानदीत बुडणाऱ्या शेतकऱ्याचे एका युवकाने प्राण वाचवले. तुषार संजय काळेबाग (वय १९, अमृत चौक) असे त्याचे नाव आहे. 

भिलवडी - येथील कृष्णानदीत बुडणाऱ्या शेतकऱ्याचे एका युवकाने प्राण वाचवले. तुषार संजय काळेबाग (वय १९, अमृत चौक) असे त्याचे नाव आहे. 

याबाबतची माहिती अशी, की औदुंबर मळीभागातील शेतकरी आदिक रामचंद्र निकम (वय ४०) हे सायंकाळी येथील कृष्णाघाटानजीक बैलजोडी धुण्यासाठी आले होते. नदीतील मगरींच्या भीतीने ते येथील पाणवठ्यावर आले. पावसामुळे पाणी वेगात वाहत आहे. एका बैलाला धुतल्यानंतर दुसरा बैल धुवून बाहेर येताना त्यांचा पाय कासऱ्यात अडकला. तो सोडवत असताना बैल पात्राबाहेर निघून गेला. ते प्रवाहात वाहून गेले. त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडू लागले. त्यांनी आरडाओरडा मदतीसाठी पुकारा केला. त्याचवेळी घाटावर मित्रासोबत कुत्रे घेऊन आलेल्या तुषारने आवाज ऐकताच कपड्यासह पाण्यात उडी घेतली. 

निकम यांच्या कमरेला धरुन प्रवाहाबाहेर ढकलण्यास सुरुवात केली. भीतीपोटी निकम तुषारला मिठी मारू लागले. परंतु त्याने बुडणाऱ्याला वाचवण्याचे कसब वापरत त्यांना काठावर आणले. निकम या प्रकाराने भेदरले होते. काही वेळानंतर अमृत चौकातील युवकांनी त्यांना बैलजोडीसह घरी सुखरुप पोहोचवले. 

सायंकाळी निकम कुटुंबीय पाटील गल्लीतील अमृत चौकात आले. त्यांनी तुषारला बक्षिसापोटी रोख रक्कम देण्याचा प्रयत्न केला. त्याने ती नाकारली. अखेर त्यांनी माझा ‘पुनर्जन्म’ झाला म्हणत चौकात पेढे वाटत कृतज्ञता व्यक्त केली. 

वाहनचालक असलेल्या संजय काळेबाग यांचा मुलगा तुषार सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकतोय. तुषारच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

टॅग्स