डॉल्बीमुक्तीतून भिजतेय मल्लेवाडीचे शिवार !

sangli police and jalyukt shivar
sangli police and jalyukt shivar

पोलिसांचा पथदर्शी प्रकल्प : सुखकर्ता बंधाऱ्याचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्या उद्‌घाटन

सांगली/मिरज : गेल्या गणेशोत्सवात जिल्हा पोलिसांनी "डॉल्बीमुक्तीतून जलयुक्त शिवार' ही संकल्पना मांडली. यासाठी गणेश मंडळांनी सढळहस्ते मदत केली. यातून जिल्ह्यातून दोन बंधारे आकाराला आले आहेत. मिरज तालुक्‍यात मल्लेवाडी येथे "सुखकर्ता' बंधारा बांधला. तर मणेराजुरी (ता. तासगाव) येथील ओढ्यावर "विघ्नहर्ता' बंधारा बांधण्यात आला. सुखकर्ता बंधाऱ्यात म्हैसाळ योजनेचे पाणी साठले आहे. एक हजार एकर शेतीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाणीपुरवठा होऊ लागला आहे. पोलिसांनी राबवलेल्या विधायक संकल्पाला असे मूर्त स्वरूप आले आहे.

गतवर्षी डॉल्बीच्या दणदणाटाने होणारे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली होती. डॉल्बीवर खर्च होणारे पैसे विधायक कामासाठी करा, असे आवाहन गणेश मंडळांना केले. मंडळांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत गणेश मंडळांच्या बैठका घेतल्या. डॉल्बीचे दुष्परिणाम सांगितले. त्यासाठी डॉक्‍टरांची मदत घेतली. गणेश उत्सवातून विधायक आणि रचनात्मक काम करण्यासाठी मंडळांना आवाहन केले. डॉल्बीच्या खर्चाला फाटा देऊन तो निधी जलयुक्त शिवारसाठी जमा करण्याचे आवाहन केले.

जिल्ह्यातील 863 गणेश मंडळांनी 27 लाख 80 हजार रुपये पोलिसांना दिले. अधीक्षक शिंदे यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द केली. जलयुक्तशिवार अंतर्गत बंधारे बांधावे, अशी विनंती केली. बंधाऱ्यांना "सुखकर्ता' आणि "विघ्नहर्ता' असे नामकरण करण्यासही सुचवले. त्यातून मल्लेवाडी येथे सुखकर्ता बारमाही बंधारा आणि मणेराजुरी येथे विघ्नहर्ता बंधारा बांधला गेला.

मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजू मोरे यांच्या आवाहनाला तालुक्‍यातून चांगला प्रतिसाद मिळाला. मल्लेवाडी येथे स्थानिक स्तर पाटबंधारेमार्फत बंधाऱ्याचे काम पूर्णत्वाला आले. यासाठी सुमारे चौदा लाखांचा खर्च आला आहे. बंधाऱ्याच्या मागे सुमारे तीनशे मीटरपर्यंत पाणीसाठा होतो. सुमारे तीनशे एकर शेतीला प्रत्यक्ष आणि उर्वरित अप्रत्यक्ष याद्वारे एक हजार शेती पाण्याखाली आली आहे. येथून काही अंतरावरून म्हैसाळ प्रकल्पाचा एरंडोली शाखा कालवा जातो. त्यातून सोडलेल्या पाण्याने बंधारा भरला आहे. ऐन उन्हाळ्यात हा परिसर पाण्याखाली आला आहे.
गणेश मंडळांच्या वर्गणीतून बांधलेल्या मल्लेवाडीतील सुखकर्ता बंधाऱ्याचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता.19) दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे.

"डॉल्बीमुक्तीला लोकसहभागाची जोड देऊन लोकांच्या हितासाठी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुखकर्ता व विघ्नहर्ता बंधारे बांधले गेले. यंदाही हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जाईल. बंधारे निर्माण करताना एका बाजूला निर्मितीचा आनंद आहे. तर दुसऱ्याबाजूला पोलिस आणि जनतेमध्ये समन्वय निर्माण होत असल्यामुळे समाधानी आहे. जलयुक्त शिवारसाठी वर्गणी देणाऱ्या गणेश मंडळांना विघ्नहर्ता पुरस्कार दिले जाणार आहेत. लवकरच त्याचे वितरण होईल.''
-पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com