सांगलीत पोलिसांकडून 11 ठिकाणी 'आयपी फोन'

Sangli police availability of IP Phones in 11 places
Sangli police availability of IP Phones in 11 places

सांगली : सांगली व मिरजेतील महत्त्वाचे चौक किंवा परिसरात एखादी दुर्घटना, गुन्हा घडल्यास त्याची माहिती आता तातडीने थेट पोलिस कंट्रोल रूमला कळवता येणार आहे. जिल्हा पोलिस दलामार्फत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आयपी फोन (इंटरनेट फोन) बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे केवळ रिसिव्हर उचलला तरी कंट्रोल रूमला फोन लागेल आणि नागरिकांना थेट तक्रार करता येईल. कोणत्याही गुन्ह्याची, घटनेची माहिती तातडीने पोलिसांना मिळणे शक्‍य होईल. अशी आयपी फोन सुविधा पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच येथे सुरू होत आहे. 

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या संकल्पनेतून ही अत्याधुनिक सेवा सुरू होत आहे. त्यामुळे कोणतीही घटना, गुन्ह्याची माहिती कोठे द्यावी आणि आपले नाव गुप्त राहावे याबाबत साशंक असलेल्या नागरिकांसाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे पोलिस ठाण्याच्या हद्दीचा वाद, पोलिस ठाण्यांचा फोन नंबर माहिती नसणे यातून नागरिकांची सुटका झाली आहे. अनेकवेळा नागरिकांसमोर एखादा गुन्हा, दुर्घटना, अपघात, दंगल घडते. मात्र, त्याची तातडीने माहिती पोलिसांना देण्याची इच्छा असली तरी ती देता येत नाही. त्यामुळे अनेक गुन्हे, घटना पोलिसांना कळण्यातही वेळ जातो. हे सर्व प्रश्‍न या सुविधेमुळे सुटणार आहेत. 

काय आहे आयपी फोन... 

सांगली आणि मिरजेत वर्दळीच्या, संवेदनशील अशा 11 ठिकाणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित हे फोन बसवले जाणार आहेत. ही एकप्रकारे हॉटलाईन सारखी यंत्रणा असते. रिसिव्हर उचलला की थेट पोलिस मुख्यालयातील कंट्रोल रूमला फोन लागतो. तेथे माहिती देता येईल. त्यानंतर ती माहिती संबंधित हद्दीच्या पोलिस ठाण्यात कळवली जाईल. त्यामुळे घटनेची माहिती तातडीने मिळून लवकर कारवाई शक्‍य होणार आहे. 

या ठिकाणी असणार आयपी फोन 

कॉलेज कॉर्नर, भारती विद्यापीठ, पुष्पराज चौक, राममंदिर, गणपती मंदिर परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, मिरज येथील मार्केट यार्ड या सात ठिकाणी फोन बसवलेत. उर्वरित चार ठिकाणी फोन बसवून आठ दिवसांत ही सुविधा सुरू करण्यात येईल. तेथेच कॅमेरेही असतील. त्यामुळे फोन चोरीस जाणार नाही. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे, असे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगितले. 

तक्रारीसाठी पोलिस ठाण्यात जावे लागत असल्याने अनेकजण तक्रार नोंदवत नाहीत. त्याचा फायदा गुन्हेगारांना होतो. म्हणून सिटिझन पोर्टल लॉंच केले. या माध्यमातून तक्रार नोंदवता येईल. पोलिस ठाण्याच्या वेबसाईटवरून ऑनलाईन तक्रार नोंदवता येईल आणि त्याची रीतसर पावतीही मिळेल. 100 नंबर अनेकदा व्यस्त असतो. त्यामुळे ज्येष्ठांसाठी 1090 आणि महिलांसाठी 1091 असे दोन क्रमांक तक्रारी नोंदवण्यासाठी दिले आहेत. 

- सुहेल शर्मा, पोलिस अधीक्षक, सांगली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com