रयत भाजपकडे, शेट्टींची गट्टी कोणाशी? 

रयत भाजपकडे, शेट्टींची गट्टी कोणाशी? 

इस्लामपूर - सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापना व अध्यक्षपदाच्या निवडीत वाळवा तालुक्‍यातील रयत विकास आघाडीचे सदस्य भाजपसोबत राहतील, आमचा त्यांना पाठिंबा आहे, असे आज सर्वपक्षीय आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. दरम्यान, रयत विकास आघाडीने दुधगाव येथील स्वाभिमानीच्या सदस्यासह पाच जणांचा पाठिंबा गृहीत धरला, मात्र त्या सदस्याच्या पाठिंब्याबाबत खासदार राजू शेट्टी यांची भूमिका मात्र गुलदस्त्यात राहिली. खासदार शेट्टी यवतमाळमध्ये असल्याने बैठकीला अनुपस्थित होते; शिवाय बैठकीदरम्यान फोनवरून त्यांनी भूमिका जाहीर करण्यास नकार दिल्याने त्यांच्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

राज्य मंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, वनश्री नानासाहेब महाडिक, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सी. बी. पाटील, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, गौरव नायकवडी, आरपीआयचे अरुण कांबळे या वेळी उपस्थित होते. मंत्री खोत म्हणाले, ""नगरपालिकेबरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला मिळालेले यश मोठे आहे. निवडणुकीनंतर आम्ही सर्वच संपर्कात होतो. मात्र आमच्यात फूट पडल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या होत्या. रयत विकास आघाडी आणि स्वाभिमानीचा एक सदस्य अशा सर्वांनी एकमताने भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सत्ता स्थापनेसाठी रयत विकास आघाडीला सन्मानाने निमंत्रित केले आहे. सर्वांनी मिळून आदर्श कारभाराला प्राधान्य देण्याचे अभिवचन दिले आहे. त्यामुळे एकमुखाने पाठिंब्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी अनेक वर्षे व गेल्या पाच वर्षांत ज्यांनी अत्यंत गैर व भ्रष्ट पद्धतीने जिल्हा परिषदेत कारभार केला, त्यांचा अस्त करण्यासाठी जनतेने आम्हाला कौल दिला. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार यापूर्वी झाला आहे, म्हणून त्यांची सत्ता जनतेने उलथवून टाकली. गैरकारभार करणाऱ्यांना सत्तेत स्थान द्यायचे नाही या हेतूने आमच्या सर्वांचा शत्रू एक आहे. आम्ही कधीच त्यांची सोबत करणार नाही.'' 

आमदार नाईक म्हणाले, ""वाळवा तालुक्‍यातील प्रस्थापित सत्तेला विरोध म्हणून नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आम्ही एकत्र आलो. चांगले यश मिळाले आहे. लोकांचा पाठिंबा वाढत आहे. खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा झाली असून स्वाभिमानीचा एक सदस्य आणि रयत विकास आघाडीचे चार सदस्य भाजपसोबत राहतील. जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत आणि अध्यक्ष निवडीत आमच्या आघाडीचा महत्त्वाचा वाटा राहील.'' रयत विकास आघाडीचे चारही सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

मतभेद आणि विसंवादाचेच दर्शन 
खासदार राजू शेट्टी यांच्या भूमिकेबाबत तसेच मंत्री खोत आणि खासदार शेट्टी यांच्यातील तणावपूर्ण संबंधांबाबत माध्यमांमध्ये जी चर्चा आहे, त्याची धास्ती रयत विकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी घेतल्याचे दिसले. पत्रकार परिषदेदरम्यान खासदार शेट्टी यांना फोन लावून त्यांचे बोलणे थेट पत्रकारांना ऐकवायचे, असे नियोजन या नेत्यांनी केले होते. त्यांना फोन लागतो किंवा नाही हे पाहण्यासाठी तासभर आधी प्रयत्न सुरू असल्याचे खुद्द श्री. महाडिक यांनी सर्वांसमक्ष सांगितले. प्रत्यक्षात शेट्टी यांनी सर्वच नेत्यांचा अपेक्षाभंग केला. एक तर बराच वेळ त्यांचा फोन लागत नव्हता आणि जेव्हा लागला तेव्हा खासदार शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलायला नकार दिला. यावरून आघाडीच्या नेत्यांनी किती जरी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगितले तरी मतभेद आणि विसंवाद अद्याप तसाच असल्याच्या मुद्याला पुष्टीच मिळाली आहे. रयत विकास आघाडी भाजपसोबत जाईल, पण स्वाभिमानीचा एक सदस्य नेमकी काय भूमिका घेणार? हा प्रश्‍न अद्याप गुलदस्त्यातच राहिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com