किस में कितना है दम...?

किस में कितना है दम...?

जिल्हा परिषदेत शून्य असलेला भाजप या वेळी प्रथमच प्रमुख पक्ष म्हणून झेडपीच्या सामन्यात उतरत आहे. चार आमदार आणि एका खासदारांसह जिल्ह्यात पक्के बस्तान बसवलेल्या भाजपची एक्स्प्रेस नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्येही सुसाट आहे. शिवसेना, स्वाभिमानी आणि जनसुराज्य यांचे डबे तिला जोडणार की अलग होणार, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे.  काँग्रेस-राष्ट्रवादीमधला वाद म्हणजे ताटातले वाटीत  आणि वाटीतले ताटात असा आजवरचा मामला. जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी गलितगात्र आहे. विरोधी काँग्रेस आता स्वबळावर झेंडा फडकवण्याचा इरादा व्यक्त करीत आहे. त्याचवेळी दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीची शक्‍यता होईल की नाही हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या सामन्यात प्रथमच बहुरंगी ढंग दिसताहेत!
 

स्वबळाच्या खुमखुमीमुळे रंगणार जिल्हा परिषदेचा बहुरंगी सामना

भाजपला झीरो टू हिरोची संधी 
भाजपचा लोकसभा, विधानसभेतील यशानंतर जिल्हाभर झालेला विस्तार ही अंगावरची सूज नाही, हे दाखवण्याचे आव्हान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आहे. राष्ट्रवादीसोबत ‘अंडरस्टॅंडिंग’चे राजकारण करताना जिल्हा परिषदेत खातेही खोलता न आलेल्या भाजपने  तेथे झेंडा फडकवण्याची भाषा करावी, इतकी बेरीज होऊ शकते. शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रासपचे बळ मिळाले तर ही युती सर्वच मतदार संघांत मुख्य स्पर्धक राहील. अर्थात, घटकपक्षांत स्थानिक नेत्यांतील टोकाचा संघर्ष, पक्षांतर्गत कुरघोड्यांचे गतिरोधक मोठे आहेत. ते पार केल्यास लाल दिव्याचे बक्षीस असल्याने नेत्यांनी कंबर कसली आहे. ‘जेजेपी’चा हात सोडून एकट्याने पाण्यात उडी घेण्याची भाषा करणारे खासदार संजय पाटील  यांच्यासमोर सर्वांना सोबत घेण्याचे आव्हान असेल. आमदार शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, विलासराव जगताप, सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज  देशमुख, गोपीचंद पडळकर अशी भाजपची नेत्यांची  मोठी दमदार फळी आहे. या यादीत अजितराव घोरपडेंचे नाव मात्र अद्याप निश्‍चित नाही.

काँग्रेसला ‘दादा’ व्हायची संधी
विधान परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत भरघोस यश मिळवणाऱ्या काँग्रेसला जिल्हा परिषद  निवडणुकीतही यश मिळण्याचा विश्‍वास वाटत आहे. विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला धोबीपछाड दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये जणू बारा हत्तींचे बळ संचारले आहे. नूतन आमदार आणि जिल्हाध्यक्ष  मोहनराव कदम यांनी जिल्ह्यात बैठकांचा धडाका लावला आहे. त्यांच्या सत्काराच्या निमित्ताने काँग्रेस एकप्रकारे जिल्हा परिषदेच्या प्रचारालाच लागली आहे. सध्यातरी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असला तरी स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याचे स्वातंत्र्यही दिले आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सध्या २३ सदस्य आहेत. आमदार मोहनराव कदम यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर सध्या दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातून दोन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याचीच चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसमधील वादाचे ग्रहण अद्यापही कायम आहे. कदम-दादा गटातील वादांचे पडसाद अजूनही सुरूच आहेत. जयश्री पाटील-विशाल पाटील यांनी एकत्रितपणे इच्छुकांच्या मुलाखतींना प्रारंभ करून एकीचा नारा दिला आहे. ज्येष्ठ नेते आमदार पतंगराव कदम, आमदार मोहनराव कदम, युवकचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी कार्यक्रम, बैठकांमधून जिल्हा ढवळून काढला आहे. राष्ट्रवादीवर वर्चस्व गाजवण्याची संधी काँग्रेसला पंधरा वर्षांत प्रथमच मिळत आहे. कवठेमहांकाळ आणि जत तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये  प्रवेश केला आहे. काँग्रेसचे जिल्ह्यातील आव्हान  बळकट आहे. मात्र मनापासून एकी झाली तरच...!

खिळखिळी राष्ट्रवादी तरणार काय?
जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादीची अवस्था आज अस्तित्वासाठीचा लढा अशी झाली आहे. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपसह अन्य पक्षात मोठ्या संख्येने आउटगोईंग झाले. त्याचे परिणाम नगरपरिषद  नगरपंचायत निवडणुकांमध्येही दिसले. राष्ट्रवादीकडे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते उरले आहेत. राष्ट्रवादीची मुलूखमैदान तोफ आर. आर. पाटील यांच्या पश्‍चात राष्ट्रवादीची सर्व मदार आता आमदार जयंत पाटील यांच्यावरच असेल. आता त्यांना सत्तेत राहणे हेच आव्हान असेल. त्यासाठी तो कोणता करिष्मा करतात, काँग्रेससोबत हातमिळवणी करतात का? की पूर्वाश्रमीच्या सहकारी आणि आता भाजपवासी झालेल्यांची हातमिळवणी करतात याबाबत सर्वत्र  कुतूहल आहे. आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून खासगी संस्थेतर्फे सर्वेक्षण न करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडून येण्याच्या निकषावर उमेदवारी दिली  जाणार आहे. जिल्हा परिषदेसह ६ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. हे बळ टिकवणे हेच शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. आमदार पाटील, सुमन पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि मानसिंग नाईक, अरुण लाड यांच्यावर राष्ट्रवादीची सध्याची धुरा आहे. 
वाळवा तालुक्‍यात राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह सर्व पक्ष एकत्र येऊन आघाडी निश्‍चित झाली आहे. तासगाव, कवठेमहांकाळमध्ये खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यासाठी ताकद लावली आहे. जतमध्ये ॲड. चन्नाप्पा होर्तीकर, रमेश पाटील आणि खानापुरात बाबासाहेब मुळीक अशी काही नावे राष्ट्रवादीची जमेची बाजू. जनसुराज्य शक्ती यंदा भाजपबरोबर जाण्याचाही जतमध्ये फटका बसेल. मिरजेत सर्व मदार अजितराव घोरपडेंवर असेल. कसबेडिग्रजसाठी आनंदराव नलवडे यांना पक्षात घेतले आहे. शिराळ्यात राष्ट्रवादी-काँग्रेसची कायमची 
आघाडी आहे.  

‘स्वाभिमानी’च्या खोंडांची फुरफुर
केंद्र व राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपचा घटकपक्ष असला तरी जिल्ह्यात स्वतंत्र भूमिका घेण्याची तयारी सुरू आहे. शिराळा, वाळव्यात भाजप, सेनेला सोबत घेताना जिल्ह्यात विधानसभा निहाय विविध आघाड्या केल्या जाऊ शकतात. खासदार राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मूड तसाच दिसतोय. स्वाभिमानी, शिवसेना, रासप एकत्र आल्यास काही  मतदार संघात प्रभावी कामगिरी होऊ शकेल. यावेळी कार्यकर्त्यांनी संधी देण्यासाठी असा निर्णय ते घेऊ शकतील. खासदार संजय पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सदाभाऊंना बांधून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी जिल्ह्यात घटकपक्षांत मोठी दरी आहे. शिवसेनेत आमदार अनिल बाबर, माजी आमदार संभाजी पवार यांची ताकद आहे. ते कुणासोबत जातात,  याकडेही लक्ष असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com